आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ. कराडांनी दिला होता एक हजार मेगावॅट प्रकल्पाचा प्रस्ताव:जायकवाडीत सौरऊर्जा प्रकल्पावरून भाजप - राष्ट्रवादीमध्ये वाद तापला

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योग पळवापळवीवरून राज्यातील सत्ताधारी, विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. त्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनीही उडी घेतली. जायकवाडी जलाशयावर एक ते दोन हजार मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा माझा प्रस्ताव मविआ सरकारमधील तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रोखला, असा आरोप त्यांनी केला, तर प्रकल्प उभारणीविषयी डाॅ. कराड यांनी फक्त एक पत्र दिले होते. सरकार केवळ पत्रावर चालत नाही, असे प्रत्युत्तर पाटील यांनी िदले.

मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष असताना डाॅ. कराड यांना काही जलतज्ज्ञांनी जलाशयांचे बाष्पीभवन रोखून सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प राबवण्याची सूचना केली होती. कराड यांनी थेट जायकवाडीतच असा प्रकल्प असावा, असे प्रयत्न सुरू केले. आणि पाण्यावर तरंगणारे सौरऊर्जा पॅनल्स टाकण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यासाठी राज्य सरकारला २८ एप्रिल २०२२ रोजी पत्र दिले. तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी त्यावर कोणतीही हालचाल केली नाही, असे डाॅ. कराड यांचे म्हणणे आहे.

नकारात्मक अहवाल दिला डॉ. कराड म्हणाले की, माझ्या प्रस्तावावर पाटील यांनी नेमलेल्या समितीचा अहवाल नकारात्मक आल्याने मी केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांना भेटलो. त्यांनी तसेच राज्याचे जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प उभारणीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. जलसंपदाचे सहसचिव आर. आर. शुक्ला यांनी यापूर्वी प्रकल्पाविषयी नकाराचे पत्र एनटीपीसीला (नॅशनल थर्मल पाॅवर काॅर्पोरेशन) दिले होते. आता व्यापक देशहित पाहता यासाठी परवानगी देत असल्याचे पत्र त्यांनी दिले आहे.

समिती स्थापन केली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, डाॅ. कराड यांनी एप्रिल २०२२च्या अखेरीस फक्त एक पत्र लिहिले होते. सरकार फक्त पत्रावर चालत नाही, खरे तर एनटीपीसीकडून प्रस्ताव यायला हवा होता. तरीही केंद्रीय मंत्री म्हणून आम्ही कराडांच्या पत्राची दखल घेऊन जूनच्या प्रारंभी एक समिती स्थापन केली होती. डाॅ. कराड यांना भाजपने यापुढे राज्यसभेची संधी नाकारून लोकसभा लढवण्यास सांगितले आहे. त्यामुळे ते अस्वस्थ होऊन खोटेनाटे आरोप करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...