आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील एसटी बसस्थानके विमानतळासारखे चकाचक करू, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर एसटी बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम केवळ १ कोटी ३२ लाख रुपयांचा विकास कर भरला नाही म्हणून रखडले आहे.
पाच वर्षांपूर्वी मध्यवर्ती बसस्थानकाच्या (सेंट्रल बसस्टँड) नूतनीकरणासाठी १८ कोटी ३२ लाखांचा निधी शासनाने मंजूर केला. मात्र, विकास कर भरला नाही म्हणून महापालिकेने बांधकाम परवानगी रोखून धरली आहे, तर स्मार्ट सिटीकडे आमचे दोन कोटी थकीत आहेत. त्यातून हा कर वळता करावा, असा आग्रह एसटी महामंडळाने धरला आहे. त्यामुळे बसस्थानकाचे नूतनीकरण पाच वर्षांपासून थांबले आहे.
नूतनीकरणाचे प्रयत्न १९९६ पासून सुरू आहेत. २०१७ मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बसस्थानकासाठी निधी मंजूर केला होता. ‘फाइव्ह स्टार’ बसस्थानक उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. व्यापाऱ्यांसाठी गाळे, अत्याधुनिक फलाट, स्वच्छ स्वच्छतागृहे, उपाहारगृह, चालक-वाहकांसाठी रेस्ट रुम, प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, वाहनतळ, डेपो अशा दोन मजली बसस्थानकाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, केवळ विकास कर भरल्याशिवाय बांधकाम परवाना देणार नाही, असा आग्रह महापालिकेने धरल्यामुळे हे नूतनीकरणाचे काम रखडले आहे.
बांधकाम परवाना मिळत नसल्याने स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम रखडले आहे. स्थानकाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. छताचे प्लास्टर पडत आहे. काही ठिकाणी स्लॅबचे लोखंडी गज उघडे पडले आहेत. स्थानकाच्या भिंतीचे पोपडे निघाले आहेत. स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. स्थानकातील प्रवाशांना बसण्यासाठी असलेले अपुरे पडत आहेत. त्यामुळे आता नव्या स्थानकाची गरज आहे.
‘स्मार्ट सिटी बस’साठी करतात आमच्या सुविधांचा वापर : एसटी
मनपाच्या ‘स्मार्ट सिटी’ने ‘माझी स्मार्ट बस’ या उपक्रमात एसटीची जागा बस डेपोसाठी वापरायला घेतली आहे. शिवाय शहरातील एसटीचे अनेक थांबे स्मार्ट सिटीकडून वापरले जातात. एसटीचे मुकुंदवाडी येथील वर्कशॉपही वापरले जात होते. या सर्व वापराचे स्मार्ट सिटीकडे सुमारे दोन कोटी रुपये थकीत आहेत. त्यातून मनपाने विकास कराची रक्कम वळती करावी आणि आम्हाला बांधकाम परवाना द्यावा. मागील दोन वर्षांपासून आम्ही हा प्रस्ताव ठेवला आहे. आता नवीन आयुक्तांना देखील याबाबत विनंती करणार असल्याचे एसटीचे कार्यकारी अभियंता गणेश राजगिरे यांनी सांगितले.
एसटीला कर भरावा लागेल : मनपा
एसटी महामंडळाने ‘स्मार्ट सिटी’कडे बाकी असलेल्या निधीतून पैसे वळवण्याचा प्रस्ताव दिला आहे, पण तशी तरतूद नाही. हा विकास कर स्वतंत्रपणे भरणे अपेक्षित आहे. असा मनपा नगररचना विभागातील वरिष्ठांचा दावा आहे.
दृष्टिक्षेपात बसस्टँड
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.