आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:पिककर्ज मागणीच्या अर्जावरील जातीच्या रकान्यामुळे शेतकऱ्यांतून असंतोष, आता शेतकऱ्यांची जात पाहून कर्ज देणार का?

हिंगोली2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पिककर्जाच्या अर्जावर जातीचा उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आल्याने शेतकऱ्यांतून तिव्र असंतोष निर्माण झाला असून आता जात पाहून पिककर्ज देणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे आता शेतकरी संघटना व स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक भुमीका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हिंगोली जिल्ह्यात बँकांनी पिककर्ज वाटपाला सुरुवात केली आहे. यावर्षी ११६८ कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उदिष्ट असून सध्याच्या स्थितीत ६० कोटी रुपयांचेच कर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे आर्थिक अडचण असतांना पेरणी करावी तरी कशी असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. पेरणीसाठी बँकांकडून पिककर्ज मिळावे यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे.

मात्र जिल्ह्यात पिककर्जाचे अर्ज भरण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने तयार केलेल्या अर्जावर शेतकऱ्याचे नांव, गाव, मोबाईल क्रमांक, वार्षिक उत्पन्न, शिक्षण, कुटुंबातील सदस्य या सोबतच जात देखील विचारण्यात आली आहे. यामुळे अर्ज भरतांना शेतकऱ्यांना जातीचा उल्लेख करावा लागत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांतून तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. बँकांकडून शेतकऱ्यांची जात पाहून कर्ज दिले जाणार आहे काय असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. बँकांनी कर्ज मागणीच्या अर्जातील जातीचा उल्लेख टाळावा अशी मागणी केली जाऊ लागली आहे.

शेतकऱ्यांची जात पाहून कर्ज देणार का? ः उत्तमराव वाबळे, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना

शेतकरी अन जातीचा काहीही संबंध नाही. सर्व शेतकरी एकच आहेत त्यांचे प्रश्‍नही एकच आहेत. मात्र बँकेने पिककर्ज देण्यासाठी जातीचा उल्लेख करणे चुकीचे आहे. बँकांकडून शेतकऱ्यांची जात पाहून कर्ज देणार का?, बँकांनी पिककर्ज मागणीच्या अर्जातील जातीचा उल्लेख काढून टाकावा.

स्वाभीमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार ः नामदेव पतंगे, युवा जिल्हाध्यक्ष स्वाभीमानी शेतकरी संघटना

शेतकऱ्यांना पिककर्ज देतांना जात विचारणे चुकीचे आहे. शेती आहे म्हणजे तो शेतकरी त्याला कुठलीही जात नाही, त्यामुळे बँकेने तातडीने जातीचा रकाना हटवावा अन्यथा स्वाभीमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. या संदर्भात सेनगाव तहसील  कार्यालयाकडे निवेदनही सादर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...