आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेची मुदत संपल्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या गाड्या जमा करण्यात आल्या. सोमवारी सभापती व जिल्हा परिषद अध्यक्षांचे कार्यालय मात्र सुरूच होते. पहिलाच दिवस असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतरही नागरिकांच्या सोयीसाठी कार्यालय सुरू ठेवण्याची विनंती जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे जि. प. सदस्यांनी सांगितले. अनेक सदस्यांची आपल्या गटातील कामांचे शिफारस पत्र घेण्यासाठी धावाधाव सुरू होती.
जिल्हा परिषदेची मुदत संपल्यामुळे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारीच आता सर्व कारभार सांभाळतील. शेळी, मेंढी, गाय आदींसाठी मिळणाऱ्या अनुदानासाठी एका जि. प. सदस्याने शिफारस पत्र आणले होते. अध्यक्षा मीनाताई शेळके यांच्या दालनात त्यांच पती रामुकाका शेळके बसले होते. शेळके यांच्या पत्रावर त्यांनी लाभार्थ्यांची नावे लिहून आणली होती. त्यावर रामुकाका यांना स्वाक्षरी करण्याची संबंधित सदस्याने विनंती केली. मात्र, त्यांनी नकार दिला. मी कधीच पत्नी म्हणजेच मीनाताईची स्वाक्षरी करीत नसल्याचे त्यांनी हात जोडून सांगितल्यावर सदस्य दालनाबाहेर गेले. करमाड गटात अध्यक्षपदाच्या कार्यकाळात २६ कोटींची कामे केल्याचे शेळकंेनी सांगितले. प्रारंभी मीनाताई शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून ३ वर्षे काम करत होत्या. पुढे अडीच वर्षे त्यांना अध्यक्षपदाचा मान मिळाला. काँग्रेसचे असलो तरी सर्व पक्षांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे रामुकाका यांनी सांगितले.
अन् लेखाधिकाऱ्यांच्या दालनातील शिपाईही गायब
मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे दुपारनंतर आपल्या दालनात आले तेव्हा एकही शिपाई बाहेर नसल्याने ते आश्चर्यचकित झाले. प्रशासकांच्या नियुक्तीमुळे सर्व शिपाई जिल्हा परिषदेत परत आले. जेव्हा त्यांनी यासंबंधी विचारणा केली तेव्हा दोन शिपाई हजर झाले. सावंगी गटातील काँग्रेसचे जि. प. सदस्य संतोष शेजुळ यांंनी चार पुलांच्या शिफारशींवर विचार झाला नसल्याचे सांगितले. मागील वर्षी झालेल्या पावसात ओव्हर जटवाडा येथील दोन पुल वाहून गेले. इस्लामपूर वाडी ते ओव्हर आणि पाणपोई ते इस्लामपुर या रस्त्यांवरील पुलांचा त्यात समावेश आहे. सर्वसाधारण सभेत यासंबंधी विषय मांडण्यात आला होता. नायगावला भाडेतत्वावर अंगणवाडी सुरू असून येथे इमारतीसाठी मागणी होती. शहर पळशी येथे दोन पुलांची मागणी होती असेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.