आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणने संमतीविना शेतात रोवले रोहित्र:शेतकऱ्यांना खांबाचे भूभाडे देण्याचा निर्णय कलेक्टरने 90 दिवसांत निर्णय घ्यावा-खंडपीठ

औरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या संमतीविना शेतांमध्ये विजेच्या तारा, विद्युत खांब, खांबासाठी ताण तसेच रोहित्र (ट्रान्सफार्मर) बसवलेले आहे. याचे भू-भाडे देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेत बीड जिल्हाधिकाऱ्यांनी 90 दिवसात निर्णय घ्यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी दिल्याची माहिती ॲड अजित काळे यांनी दिली.

महावीतरण कंपनीने शेतामध्ये टेलिग्राफ ॲक्ट 1885 च्या कलम 10 व 16 नुसार विजेच्या तारा, पोल, ताण, रोहीत्र बसवताना शेतकऱ्यांची संमती घेणे आणि करार करणे आवश्यक आहे. करारानूसार शेतकऱ्यांना भूईभाडे दिले पाहिजे. असे असले तरीही याबाबात आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही, उलट शेतकऱ्यांना विजेच्या बिलासाठी वेठीस धरले जाते. आजपर्यंतचे भूईभाडे काढले तर शेतकऱ्यांनाच पैसे द्यावे लागणार आहेत.

शेतकऱ्यांना भूई भाडे मिळावे यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी शेतकऱ्याना जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी पिंम्पळा व दौलावडगाव येथील शेतकऱ्यांचे अर्ज स्वतः जमा करून बीड जिल्हाधिकारी कार्यालयात 14 मार्च रोजी जमा केले होते. मात्र, त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी ॲड. अजित काळे यांच्या मार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावर 6 ऑगस्ट सुनावणी झाली. सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 90 दिवसात निकाल द्यावा असे आदेश दिल्याचे ॲड अजित काळे यांनी सांगीतले.

राज्यातील पहिलेच प्रकरण

महावितरणकडून विजेच्या तारा, पोल, रोहित्र यांचे भू-भाडे मिळावे यासाठीचे हे राज्यातील पहीलेच प्रकरण आहे. यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी हा लढा उभारला आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर, नगर अशा विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहे. मात्र एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही म्हणून याचिका दाखल केली होती.

शेतकऱ्यांचा पाठपुरवा

शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी सदर विषयी न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. या न्यायालयीन लढ्यात पिंम्पळा (जि. बीड) येथील शेतकरी चंदू शेंडगे, महादेव सूंबे, चांदबेग बाबूबेग, मयूर सूंबे, भामाबाई शेंडगे, संपत शेंडगे, यांनी भूभाडे मागणीसाठी जिल्हाधिकारी, महावितरण कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता यांच्याकडे अर्ज केले होते.