आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनी घाटीचा पाय खोलात:रेमडेसिविरचा काळाबाजार करणारा चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणतो : नर्स इंजेक्शन कचऱ्यात टाकायची, मी तिथून उचलून बाजारात विकायचो

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शल्यचिकित्सक : आमच्याकडून इंजेक्शन चोरीस गेलेच नाहीत; आरोग्य उपसंचालकांनी नियुक्त केली चौकशी समिती

मिनी घाटीचा (चिकलठाणा जिल्हा रुग्णालय) चतुर्थश्रेणी कर्मचारी अनिल ओमप्रकाश बोहतेला रेमडेसिविर इंजेक्शन काळ्या बाजारात विकताना पुंडलिकनगर पोलिसांनी पकडले. नर्स इंजेक्शन कचऱ्यात टाकायची, तिथून ते उचलून मी विकायचो, असा जबाब त्याने दिला. त्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी इंजेक्शन चोरीस गेलेच नाहीत, असे म्हटले आहे. मात्र, पोलिसांनी मिनी घाटीवरच संशयाची सुई ठेवली असून नर्स, वॉर्ड इन्चार्ज, स्टोअर कीपरसह इतरांची चौकशी करणार आहेत. दरम्यान, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनीही तीन सदस्यांची एक स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त केली असून १५ दिवसांत अहवाल मागितला आहे.

शुक्रवारी पहाटे पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांच्या पथकाने सापळा रचून बोहते व त्याच्याकडून इंजेक्शन घेणारे शिवाजीनगरातील मयूरेश्वर मेडिकल चालक मंदार अनंत भालेराव, सूतगिरणी चौकातील इंद्रा मेडिकल मालक अभिजित नामदेव तौर यांना अटक केली. एक इंजेक्शन नऊ हजार रुपयांना खरेदी करून ते वाढीव दराने बीडसह इतर ठिकाणी विकण्याचा उद्योग हे मेडिकल चालक-मालक करत होते. बोहते मिनी घाटीचा कर्मचारी असल्याने तो तेथूनच इंजेक्शन चोरत असणार, असा पोलिसांचा संशय होता. त्यानेही तसाच जबाब दिला. पण डॉ. कुलकर्णींनी त्याचा इन्कार केला. त्यामुळे पोलिसांनी मिनी घाटी प्रशासनाला पत्र पाठवले. त्यात “दिव्य मराठी’ने उपस्थित केलेले काही प्रश्नही विचारले आहेत. यात म्हटले आहे की, सरकारी कोट्यातील रेमडेसिविर इंजेक्शनची जबाबदारी कोणाची आहे? इंजेक्शनच्या वाटप किंवा देखभालीसाठी स्टेाअर कीपर किंवा तत्सम अधिकाऱ्याची नेमणूक आहे का? असेल तर ती कोणाची? इंजेक्शन ज्या वॉर्डमध्ये वापरले जाते किंवा हस्तगत झालेले इंजेक्शन ज्या वॉर्डसाठी दिले गेले त्या वॉर्डचा इन्चार्ज कोण?

दहा वर्षांपासूनची मैत्री म्हणून...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोहते वारंवार जबाब फिरवत आहे. आधी त्याने मिनी घाटीतील वॉर्ड क्रमांक २१८ मधून इंजेक्शन चोरल्याचे सांगितले. नंतर म्हणाला की, एक नर्स इंजेक्शन कचऱ्यात टाकायची, तेथून मी ते उचलायचो. मेडिकल चालक तौर दहा वर्षांपासून मित्र असल्याने आम्हा दोघांना काळ्या बाजाराची शक्कल सुचली. ग्राहक वाढवण्यासाठी भालेरावला सोबत घेतले.

टोळीतील अनेक भूमिगत
बोहते केवळ एक प्यादा असून मिनी घाटीत रेमडेसिविर काळ्या बाजारात विकणारी मोठी टोळी असावी. या टोळीचे एक कनेक्शन बीडमध्ये असावे, असा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान, बोहतेला अटक होताच टोळीतील अनेक जण भूमिगत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

रुग्णाचा मृत्यू झाल्यास ते इंजेक्शन काळ्या बाजारात जाण्याची शक्यता
रेमडेसिविरचे इंजेक्शन रुग्णाला देण्याची मिनी घाटीतील पद्धत अशी - डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नर्स इंजेक्शनची मागणी स्टोअरकडे करतात. ती मान्य झाल्यावर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांची सही असलेला फॉर्म स्टोअर कीपरकडे दिला जातो आणि इंजेक्शन मिळते. ते वॉर्ड इन्चार्ज नर्समार्फत रुग्णाला दिले जाते. यादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास ते इंजेक्शन दुसऱ्या रुग्णाला देणे अपेक्षित आहे. पण त्यावर कडक नजर ठेवणारी, तपासणारी यंत्रणा नाही. याचाच फायदा घेऊन इंजेक्शन काळ्या बाजारात जात असावेत, अशी शक्यता आहे.

बॅच क्रमांकावरून शोधणे कठीण
घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या की, आमच्याकडून एकाही इंजेक्शनची चोरी झालेली नाही. कंपनीकडून पुरवठा होताना एकाच बॅचमधील एक हजार इंजेक्शन मिनी घाटी आणि घाटी रुग्णालयाला मिळाले. त्यामुळे बॅच क्रमांकावरून इंजेक्शन कोणाचे याचा शोध लागणे कठीण आहे.

खरेदी, किती वापर केला तपासा
आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी आरोग्य सहसंचालक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नियुक्त केली. आतापर्यंत मिनी घाटीने किती रेमडेसिविरची खरेदी केली, त्यातील किती वापरले. रिकाम्या व्हायल कुठे आहेत याचीही तपासणी करावी, असे त्यांनी समितीला सांगितले.

बातम्या आणखी आहेत...