आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीकरांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन:पुलावरून पाणी वाहत असताना पुल ओलांडण्याचे जिवघेणे धाडस करू नका; जिल्हाधिकारी पापळकर यांच्या नागरीकांना सूचना

हिंगोली4 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • तलाठी, ग्रामसेवकांनी सतर्क रहावे

हिंगोली जिल्हयात मागील दोन दिवसांपासून मोठा पाऊस झाला असून त्यामुळे नदी, नाल्यांना पुर आले आहेत. मात्र पुराचे पाणी पुलावरून जात असताना नागरिकांनी पुल ओलांडण्याचे जिवघेणे धाडस करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या आहेत. हिंगोली जिल्हयात मागील दोन दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली असून दोन दिवसांत तीघे जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. यामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला असला तरी अन्य दोघांचा शोध सुरु आहे. सध्या पुढील काही दिवस आणखी पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नागरीकांना आवश्यक सूचना दिल्या आहे. जिल्हयात पुराचे पाणी पुलावरून जाताना पुल ओलांडण्याचे जिवघेणे धाडस करू नये, मदत लागल्यास तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा. गावात पुराचे पाणी येण्याची शक्यता वाटल्यास घरातील उपयुक्त साहित्य, कागदपत्रे, जनावरे इतरत्र हलवावे, तसेच घरातील वीज पुरवठा बंद करावा, घरात जंतूनाशक असेल तर ते पाण्यास विरघळणार नाही, याची दक्षता घ्यावी. पुर परिस्थितीत उंच ठिकाणाचा असरा घेण्यासाठी जाताना खाण्यासाठी सुके पदार्थ पिण्याचे पाणी, रेडीओ, टॉर्च सोबत ठेवा.

घराचे दरवाजे बंद करा, घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे ओळखपत्र राहिल याची काळजी घ्या. पुरात अडचणीत सापडला असाल तर तातडीने मदत मागा, कोणी व्यक्ती वाहून जात असेल तर दोरीच्या मदतीने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करावा. मात्र पुर आल्यानंतर पुराच्या परिसरात, नदी, नाल्यांच्या काठावर विनाकारण फिरू नये, पुराच्या पाण्यातून वाहने चालविणे, पुल ओलांडण्याचे जीवघेणे धाडस करू नका, सुरक्षित ठिकाणी रहा, मात्र विद्युत तारांना स्पर्श करू नये. पुर परिस्थितीच्या ठिकाणी गर्दी करण्याचे टाळावे अशा सूचना जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिल्या आहेत.

तलाठी, ग्रामसेवकांनी सतर्क रहावे
जिल्हयात पावसाचा अंदाज लक्षात घेऊन तलाठी व ग्रामसेवकांनी सतर्क राहून गावातील व्यक्तींशी संपर्क ठेवावा. गावात तातडीची मदत लागल्यास त्याची माहिती तहसील कार्यालयास तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षास द्यावी. पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन गावकऱ्यांचे स्थलांतर करण्यासाठी सुरक्षीत जागेचे नियोजन करावे. गावातील पुर परिस्थितीची माहिती दर एक तासाला आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी पापळकर यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...