आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विश्लेषण:पंकजा मुंडे शिवसेनेत जाण्याची शक्यता वाटल्यानेच दुसऱ्या कराडांनाही उमेदवारी

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंकजा यांच्या मागे उभे राहून नाही, तर पक्षाबरोबर राहूनच पुढे जाता येेईल हा संदेश देण्याचा पक्षाने केला प्रयत्न

(दीपक पटवे)

नांदेडच्या डाॅ. अजित गोपछडे यांना जाहीर झालेली विधान परिषदेची उमेदवारी काही कारणाने अडचणीत येऊ शकते, हे भाजपमधील गोपछडेंच्या ‘हितचिंतकां’नी लक्षात आणून दिल्याने ऐनवेळी लातूरच्या रमेश कराड यांना संधी मिळाली आहे. एक प्रकारे कराड यांना लागलेली ती लाॅटरीच आहे. पण लाॅटरीही त्यांनाच लागावी, हाही काही अपघात किंवा कराडांचे ‘नशीब’ वगैरे नाही. पक्षाच्या नेतृत्वाने ठरवून टाकलेले ते पाऊल आहे हे म्हणायला बरीच संधी आहे.

विधान परिषदेची एक जागा मराठवाड्याच्या वाट्याला आलेलीच होती. ती कोणाला मिळणार असा प्रश्न आला त्या वेळी संघाचे स्वयंसेवक राहिलेल्या आणि लोकसभा निवडणुकीत संभाव्य प्रतिस्पर्धी अशोक चव्हाण यांच्या विरोधात लढायला तयार असलेल्या डाॅ. गोपछडे यांचे नाव अग्रक्रमावर आले. त्यांना उमेदवारी जाहीर झालीही. ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्यावर नांदेडच्याच भाजपच्या काही मंडळींनी डाॅ. गोपछडेंच्या उमेदवारीला कशी हरकत घेतली जाऊ शकते आणि भाजपची ही उमेदवारीच कशी अडचणीत येऊ शकते ही बाब पक्षाच्या लक्षात आणून दिली. धोका पत्करण्याचे दिवस नसल्यामुळे तातडीने त्यांच्याऐवजी रमेश कराड यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे पक्षाची मूठ झाकलेलीच राहिली आहे. आता गोपछडे यांनी निवडणूक लढायला असमर्थता व्यक्त केली असे पक्ष म्हणतोय आणि पक्षाने थांबायचा आदेश दिला म्हणून थांबलो, असे डाॅ. गोपछडे सांगत आहेत. दोन्ही म्हणण्यात अर्थ नाही हे वास्तव आहे.

पंकजा मुंडे यांच्या मागे मोठ्या प्रमाणात वंजारी समाज आहे आणि त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे तो नाराज आहे. ट्विटर, फेसबुकवर तशा भावना दिसतातही. त्यामुळे कराडांना उमेदवारी देऊन पक्ष समाजावर अन्याय करीत नाही, हा संदेश पक्ष देऊ पाहतोय. त्याचसाठी डाॅ. भागवत कराड यांनाही पक्षाने राज्यसभेवर घेतले आहे. हे दोन्ही कराड काही काळापूर्वी पंकजांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. पंकजा यांच्या मागे उभे राहून नाही तर पक्षाबरोबर (म्हणजे आता जे पक्षाचे कर्तेधर्ते आहेत त्यांच्याबरोबर) राहूनच तुम्हाला पुढे जाता येेईल, हा संदेश त्यातून पक्षाने पंकजा समर्थकांना दिला आहे. याचे दोन राजकीय अर्थ काढता येतात. एक तर यापुढेही पंकजा यांना पक्षाकडून काही मिळायची शक्यता नाही. आणि दुसरे म्हणजे पंकजा भाजप सोडून शिवसेनेत जाण्याचे संकेत भाजपच्या नेत्यांना मिळाले असावेत. अन्यथा, डाॅ. भागवत कराडांनंतर लगेच या कराडांना विधान परिषद देण्याची घाई पक्षाने केली नसती. पंकजा शिवसेनेेत गेल्या तरी त्यांचा ज्ञातिवर्ग मात्र भाजपपासून तुटू नये, असा पक्षाचा विचार दिसतो.

पंकजा शिवसेनेत जाण्याची शक्यता किती आहे, हे सांगता येत नाही. कदाचित त्या जाणार पण नाहीत. पण एका कराडांनंतर दुसऱ्या कराडांनाही उमेदवारी दिली गेली याचा अर्थ मात्र त्या शिवसेनेत जाऊ शकतात असे भाजपच्या नेत्यांना वाटते आहे असाच होतो.

... तर पहिले नाव रमेश कराड यांचेच आले असते

रमेश कराड यांनी राष्ट्रवादीकडून घेतलेली उमेदवारी ऐनवेळी नाकारून भाजपवर उपकार केले होते त्याची परतफेड म्हणून त्यांना ही बक्षिसी मिळाली आहे, असे म्हटले जाते. त्यात तथ्य नाही असे नाही. कारण त्या माघारीच्या वेळीच त्यांना आमदारकीचा शब्द दिल्याचे समोर आलेच होते. पण तसे असते तर गोपछडेंच्या आधी त्यांनाच उमेदवारी दिली गेली असती. तसे झाले नाही. उमेदवार बदलायची वेळ आली त्या वेळी पहिले नाव कराडांचे आले कारण ते वंजारी समाजातून आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...