आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विघ्नहर्ता गणरायाची उद्या होणार प्राणप्रतिष्ठापना:‘दिव्य मराठी’ गणेशोत्सव मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपक्रमात व्हा सहभागी : घरातल्या बाप्पासह मंडळात सहभागी होऊन द्या योगदान

प्रिय,
यंदाचं वर्ष आयुष्यभर लक्षात राहील असं आहे. कोरोना महामारीने जगण्याची रीतच बदलून गेली आहे. गेल्या चार-पाच महिन्यांत व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील कितीतरी आनंदाचे क्षण आपण आतल्या आत दाबून टाकले. लग्न - कार्य.. सण - उत्सव.. सोहळे - समारंभ सगळं काही लॉकडाऊन झालं. त्यातून वाढत गेलेलं निराशेचं मळभ कधीतरी दूर व्हायला हवं होतं. अशातच श्रावण आला अन् नद्या-धरणं ओसंडली.. रानं-पानं अन् मनंही आबादानी झाली.. आता तर साक्षात विघ्नहर्ता दाराशी उभा आहे. तो उद्या घरोघरी येईल तेव्हा भीती, दु:ख, नैराश्याचं उरलंसुरलं सावटही दूर झाल्याशिवाय राहणार नाही.

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना मंडळांवर अनेक निर्बंध आले. महामारीला थोपवण्यासाठी ते आवश्यकही आहेत. पण, अशा बिकट स्थितीत या मंडळांचा विधायक वारसाही जपला पाहिजे. आणि तो या वर्षी पुढे नेईल ‘दिव्य मराठी’ गणेशोत्सव मंडळ! एरवी वृत्तपत्रांच्या कार्यालयात गणेशाची प्रतिष्ठापना होते. पण, ‘दिव्य मराठी’चे हे मंडळ थेट तुम्हा वाचकांच्या सोबतीने आणि सक्रिय सहभागाने गणेशोत्सव साजरा करणार आहे. वृत्तपत्रांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडते आहे आणि तुम्ही सारे त्याचे साक्षीदार बनणार आहात.

गणेशाची सगळीच रूपे भावतात. पण, आताच्या घडीला त्याच्या ‘विघ्नहर्ता’ रूपाची आस लागली आहे. या रूपात येऊन त्याने हे संकट दूर करावे, अशी सर्वांची मनोकामना. त्यामुळेच ‘दिव्य मराठी’चे मंडळ “विघ्नहर्ता गणेशा’ची स्थापना करणार आहे. हे मंडळच रोजच्या अंकातून सर्वांच्या भेटीला येईल. सार्वजनिक मंडळे ज्याप्रमाणे रोजच्या आरतीसाठी वेगळे नियोजन करतात, प्रसादाच्या पदार्थांतही वैविध्य जपतात, विधायक उपक्रम राबवतात, सामाजिक देखावे सादर करतात तशा साऱ्या गोष्टी आपले हे मंडळही करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या सर्वांमध्ये तुम्हालाही सहभागी व्हायचं आहे. त्यासाठी हे सादर निमंत्रण... - संपादक

राेजची पूजा
विधायक, सामाजिक उपक्रम ही आपल्या मंडळाची ‘रोजची पूजा’ असेल. त्यासाठी आम्ही रोज एक विषय देऊ. मंडळांनी त्या दिवशी तसा उपक्रम घेऊन त्याचा फोटो आम्हाला पाठवायचा आहे.

राेजचा प्रसाद
बाप्पाचा ‘रोजचा प्रसाद’ तुमच्यापैकी साऱ्या सुगरणी तयार करतील व थोडक्यात लिहिलेल्या रेसिपीसह, बनवलेल्या पदार्थाचे तबक घेतलेला स्वत:चा फोटो आम्हाला पाठवतील.

राेजचा देखावा
मंडळाचा ‘रोजचा देखावा’ही तुमच्याच सहभागाने साकारला जाईल. आम्ही दररोज त्या दिवशीचा उपक्रम जाहीर करू. मंडळांनी तो राबवून त्याचा फोटो आणि थोडक्यात माहिती आमच्याकडे पाठवावी.

माय फ्रेंड गणेशा
‘माय फ्रेंड गणेशा’ उपक्रमात रोज दिलेले गणेशाचे एक चित्र रंगवून मुलांनी छोटासा अल्बम करावा. फोटो लावून नाव, इयत्ता, पत्ता, क्रमांक लिहून स्थानिक कार्यालयाकडे द्यावा. निवडक अल्बमना बक्षिसे देऊ.

घरचा बाप्पा
‘मातीची मूर्ती.. घरातच विसर्जन’ या आमच्या अभियानाला अनुसरून आपल्या घरातील, मंडळातील पर्यावरणपूरक मूर्ती आणि सजावटीचे फोटोही आम्हाला पाठवता येतील.

उपक्रमात व्हा सहभागी : घरातल्या बाप्पासह मंडळात सहभागी होऊन द्या योगदान
विधायक पूजा, वैशिष्ट्यपूर्ण प्रसाद, सामाजिक देखावे आणि इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचे फोटो व माहिती स्वत:चे / मंडळाचे नाव, गाव आणि संपर्क क्रमांकासह सायंकाळी पाचपर्यंत आम्ही येथे दिलेल्या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर पाठवावे. तुमच्याकडून आलेल्या फोटोंतील निवडक फोटो, माहिती आम्ही दुसऱ्या दिवशी मंडळाच्या विशेष पानावर प्रसिद्ध करू. प्रत्येक कुटुंबाला आणि कुटुंबातील प्रत्येकाला उत्सवाचे दहा दिवस घरातल्या बाप्पाच्या उत्सवासोबत आपल्या या मंडळातही सहभागी होता येईल. तर मग चला, संकटावर मात करण्याकरिता, विघ्नहर्त्याच्या उत्सवातून मिळणारा उत्साह, उमेद, ऊर्जा मनात साठवण्यासाठी सिद्ध होऊया.. त्यासाठी ‘दिव्य मराठी’च्या मंडळातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत..! उपक्रमांचे नियोजन. माझा महाराष्ट्रवर

उपक्रमात सहभागासाठी व्हाॅट्सअॅप क्रमांक : औरंगाबाद - 9561748778 । बीड - 9561999886 । जालना - 9881727422

बातम्या आणखी आहेत...