आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रा वाघ Vs सुषमा अंधारे:वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणून तुम्ही उघडेनागडे फिरणार?, एकीकडे बुरखा घालू नये म्हणता आणि कमी कपडे घातले की आरडाओरड करता!

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रा वाघ : वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणून तुम्ही कपडे घालणार नाही? उघडेनागडे फिरत राहणार? सुषमा अंधारे : एकीकडे बुरखा घालू नये म्हणता आणि कमी कपडे घातले की आरडाओरड करता!

उर्फी जावेद प्रकरणावरून उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्याशी दिव्य मराठीचे विनोद यादव, अशोक आडसूळ यांची बातचीत.

प्रश्न : तुमच्या राजकीय सोयीनुसार तुम्ही तुमच्या महिलाविषयक भूमिका का बदलता?
चित्रा वाघ :
आमची भूमिका छत्रपती शिवरायांची शिकवण, सावित्रीबाईंचे संस्कार जपण्याची आहे. त्यामुळे महिलांविषयी भूमिकेत बदल करण्याचा प्रश्न नाही. उर्फी जावेद मुस्लिम आहे, म्हणून मी तिला लक्ष्य करत नाही आहे. हा धर्म विरोधकांच्या डोक्यात आहे, माझ्या नाही.

सुषमा अंधारे : चित्रा वाघ आणि भाजपच्या अनेक महिला नेत्या त्यांच्या राजकीय शिडीसाठी दलित आणि महिला अत्याचाराची प्रकरणे उचलतात. उर्फी सामाजिक ठिकाणी कोणते कपडे घालतात ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. यावर कुणाचा आक्षेप जर एका मिनिटासाठी मान्य केला तर महाराष्ट्रात जेव्हा महिलांची नग्नावस्थेत धिंड काढतात तेव्हा आक्षेप घेणारे हे लोक कोणत्या बिळात लपलेले असतात? राज्यपाल कोश्यारी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतात तेव्हा या तथाकथित महिला कुठे असतात? पूजा चव्हाण यांचा उचलून धरणाऱ्या चित्रा वाघला संजय राठोड यांच्याविरोधात आता काही बोलायचे नसेल तर तिने पूजाची बदनामी का केली? महिलांनी कोणतेही कपडे घातले नाही तरी चालेल, असे रामदेवबाबा म्हणाले होते, त्याचे काय?

प्रश्न : महिलेचे व्यक्तिगत स्वातंत्र्य तुम्हाला मान्य आहे की नाही?
चित्रा वाघ
: महिलांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा मी आदर करते. तुम्ही घरात, बंद दाराआड कसेही उघडेवाघडे नाचा. आमचे काही म्हणणे नाही. पण सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला स्वैर वागता येणार नाही. उर्फीचे वागणे अनिर्बंध स्वैराचाराचा प्रकार आहे. ती मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कपडे नसल्याच्या अवस्थेत फिरते आहे. या वृत्तीला आमचा विरोध आहे.

सुषमा अंधारे : अमृता फडणवीस आणि अभिनेत्री कंगना रनौत कोणते कपडे घालतात? यावर आक्षेप घेणे माझ्या मते चुकीचे आहे. आहे. पण ज्या प्रकारे अमृता फडणवीस, केतकी चितळे आणि कंगना यांना त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याचा अधिकार आहे, उर्फी जावेदलाही तसेच स्वातंत्र्य आहे. लोक हे का स्वीकारत नाहीत?

प्रश्न : कपडे कोणते घातले, यापेक्षा विचार कोणते मांडले हे महत्त्वाचे नाही?
चित्रा वाघ
: कपड्यांपेक्षा विचार महत्त्वाचा आहेच. पण, पहिल्यांदा कपडे तर घाला ना... वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणून उघडे-नागडे फिरणार आहात तुम्ही? मुळात उर्फीचा विषय एका महिलेने फोनद्वारे माझ्याकडे पोहोचवला. तिच्या ९ वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाले होते. तोकड्या कपड्यांमुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडते. म्हणून उर्फीसारखी विकृती मोडून काढली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका आहे.

सुषमा अंधारे : ते तर आहेच. पण मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की, एकीकडे मुस्लिम महिलांनी बुरखा घालू नये अशी मागणी काही लोक करतात. एखादीने कमी कपडे घातले तरी तुमचा आक्षेप आहे. रामदेवबाबांसारख्या व्यक्तीने महिलांनी कोणतेही कपडे घालू नयेत असे सांगितले. पण यावर तुमचा काही आक्षेप नाही? अशा प्रकारची सोयीस्कर भूमिका स्वीकारली जाते. त्यावर माझा आक्षेप आहे.

प्रश्न : तुम्हाला जो संदेश द्यायचा आहे किंवा जी टीका करायची आहे, ती तुम्ही बऱ्याच वेळा अति प्रक्षोभक भाषेत करता, असे खरेच तुम्हाला वाटत नाही का?
चित्रा वाघ :
मी हाती घेतलेला विषय समाजस्वास्थ्य टिकवण्याचा आहे. विरोधकांनी खरे तर आमच्या बाजूने यायला हवे होते. मात्र ते उर्फीला हवा देत आहेत. उर्फीला माहिती पुरवत आहेत. काही हरकत नाही. आम्ही हा विषय लावून धरू. उर्फीचा करेक्ट कार्यक्रम नक्की होईल. मी वाचा फोडल्याने उर्फीला अफाट प्रसिद्धी मिळाली हे खरे आहे, मात्र उर्फीवृत्ती ठेचणे काळाची गरज आहे.

सुषमा अंधारे : हा प्रश्न फक्त मलाच विचारला जातोय की सगळ्यांनाच विचारला जात आहे? मी जेव्हाही माझी भूमिका मांडते तेव्हा प्रक्षोभक भाषेऐवजी तार्किक पद्धतीने मांडते. संत ज्ञानेश्वरांबद्दलच्या माझ्या विधानावर जेव्हा आक्षेप घेतला गेला तेव्हाही मी तार्किक शब्दांत उत्तर दिले होते. माझी विधाने प्रक्षोभक असतील तर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि भाजपशी संबंधित अन्य महिला नेत्यांनी घरात शस्त्रे ठेवण्याबाबत वक्तव्ये केली आहेत. माझी विधाने प्रक्षोभक असतील, तर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि भाजपशी संबंधित इतर ज्या महिला नेत्या शस्त्रे घरात ठेवावीत आणि लोकांना काटायची भाषा बोलतात, त्यांची विधाने सत्संग आहेत?

प्रश्न : नको त्या विषयाला हवा देऊन तुम्ही स्वतः प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करत असता असे वाटत नाही का?
चित्रा वाघ : अजिबातच नाही. माझे विषय समाजाच्या हिताचेच असतात.
सुषमा अंधारे : चित्रा वाघला आजकाल भाजपमध्ये कुणी विचारत नाही. त्यामुळे स्वस्त लोकप्रियता मिळवण्यासाठी ती कोणत्याही मुद्द्यावर काहीही बोलत आहे. भाजपच्या महिला नेत्या लोकांचे महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष वळवण्यासाठी बेताल वक्तव्ये करत आहेत. चित्रा वाघला आमदारकीही मिळणार नाही. मंत्रिपद तर दूरची गोष्ट. पण ते मिळेल या आशेवर तिला नॉन इश्यूवर वाद निर्माण करून चर्चेत राहायचे आहे. भाजपकडेही लोकांच्या हिताचे काही मुद्देच राहिलेले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...