आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी स्टिंग ऑपरेशन:5 इंजेक्शन विक्रीसाठी आलेला दलाल पकडला; संशयाची सुई डॉक्टरकडेच

औरंगाबाद(डॉ. शेखर मगर/ रोशनी शिंपी)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
इनसेटमध्ये संशयित सुजित अशाेक साेनवणे - Divya Marathi
इनसेटमध्ये संशयित सुजित अशाेक साेनवणे
  • रेमडेसिविरचा काळाबाजार ‘दिव्य मराठी’ने अाणला उघडकीस
  • पोलिसांच्या सापळ्यातील त्रुटीमुळे साथीदार फरार
  • रामकृष्ण हॉस्पिटलची चौकशी; डॉ. हंबर्डेंनी केले आरोपाचे खंडन

अाैरंगाबादमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा माेठ्या प्रमाणावर व खुलेअाम काळाबाजार करणारे अाणखी एक रॅकेट ‘दिव्य मराठी’चे डेप्युटी चीफ रिपाेर्टर डाॅ. शेखर मगर यांनी पाेलिसांच्या मदतीने स्टिंग अाॅपरेशन करून उघडकीस अाणले. ३० हजार रुपयांना एक इंजेक्शन या दराने पाच इंजेक्शन विक्रीसाठी अालेल्या एका युवकाला सोमवारी (१० मे) दुपारी अडीच वाजता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बजरंग चौकात सापळा रचून अटक केली. मात्र पाेलिसांच्या सापळ्यातील त्रुटीचा फायदा घेऊन इंजेक्शन घेऊन अालेला त्याचा दुसरा साथीदार मात्र पसार झाला. त्यामुळे मुद्देमाल पाेलिसांच्या हाती लागू शकला नाही. सुजित अशाेक साेनवणे (२५, रा. गलवाडा, ता. साेयगाव) असे पकडलेल्या संशयिताचे नाव अाहे. शहरातील डाॅ. संदीप हंबर्डे यांच्याकडून अापण इंजेक्शन अाणून विकत हाेताे, अशी कबुली त्याने पाेलिसांकडे दिली अाहे. मात्र डाॅ. हंबर्डे यांनी या अाराेपाचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला.

सुजित रेमडेसिविरचा काळाबाजार करत असल्याची माहिती ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीला मिळाली हाेती. त्यामुळे त्याला जाळ्यात अडकवण्यासाठी प्रतिनिधी एक महिन्यापासून त्याच्याशी व्हॉट्सअॅपवर संपर्कात हाेता. त्याच्याकडे इंजेक्शनची मागणी करत हाेता. एक इंजेक्शन ३० हजार रुपयांना देतो, असे सुजितने प्रतिनिधीला कबूल केले. त्यानुसार पाच ते सहा इंजेक्शन विक्रीचा व्यवहार साेमवारी दुपारी दाेन वाजता ठरला. दिव्य मराठी प्रतिनिधीने पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. डॉ. गुप्ता यांनी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांना ट्रॅप लावण्याचे आदेश दिले. आघाव यांनी सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल यांच्या टीमला शेखर मगर यांच्यासाेबत रवाना केले.

ठरल्याप्रमाणे दुपारी दाेनच्या सुमारास सुजितने ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीला मोबाइलवर संपर्क करून आझाद चौकात बोलावले. प्रतिनिधी तिथे पाेहाेचल्यानंतर त्याने प्लॅन बदलून बजरंग चौकात येण्यास सांगितले. तिथे दुचाकीवर अालेला युवक सुजितच असल्याची खात्री पटल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगची झडती घेतली, मात्र इंजेक्शन आढळून आले नाही. या चाैकातून काही अंतरावर सुजितचा दुसरा एक साथीदार इंजेक्शन घेऊन उभा हाेता. सुजितने पैसे स्वीकारल्यानंतर ताे इंजेक्शन देणार हाेता. मात्र पाेलिसांनी सुजितवर छापा टाकताना त्याचा अन्य एखादा साथीदार असू शकताे याचा विचार करून ‘बी प्लॅन’ तयार केला नव्हता. या त्रुटीचा फायदा घेऊन सुजितचा साथीदार पसार झाला. त्यामुळे इंजेक्शन पाेलिसांच्या हाती लागले नाही. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंह जारवाल, पोलिस निरीक्षक विठ्ठल कासकर, सहायक फौजदार शिवाजी झिने, हवालदार सुधाकर मिसाळ, राजेंद्र साळुंखे, विजय पिंपळे आदींनी कारवाई केली.

औषध निरीक्षकांनी घेतली झाडाझडती : गुन्हे शाखेचे पथक रामकृष्ण हॉस्पिटल येथे दाखल झाले. त्यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाचे निरीक्षक आर. एम. बजाज यांना दुपारी ३.३० वाजता हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले. पाेलिसांनी बजाज यांना मेडिकल स्टोअरचे रेकॉर्ड तपासण्यास सांगितले. मात्र मेडिकल स्टोअर सांभाळणारे सोमनाथ आढाव तिथे नव्हते. त्यांना फोन करून बोलावून घेतले. २० मिनिटांनी आढाव आले. कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता मिळालेल्या तारखेपासून (२८ मार्च २०२१) रेमडेसिविर इंजेक्शनचे रेकॉर्ड त्यांच्याकडून मागवून बजाज यांनी तपासले. ४३ दिवसांमध्ये रामकृष्ण हॉस्पिटलच्या गुरुकृपा मेडिकलमध्ये ९१ व्हायल वापरण्यात आल्याची नोंद बजाज यांना आढळून आली. यासंदर्भात त्यांनी पाच पानांचा सर्च रिपोर्ट तयार केला आहे. वरिष्ठांना व गुन्हे शाखेच्या पोलिसांना रिपोर्ट देण्यात आला आहे.

‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने नोंदवली काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध तक्रार

दुपारी अडीच ते सायंकाळी सातपर्यंत गुन्हे शाखेचे पथक आणि ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी रामकृष्ण हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल यांनी डेप्युटी चीफ रिपोर्टर शेखर मगर यांना पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास सांगितले. कोरोनाच्या आपत्तीत औषधांंचा काळाबाजार करणाऱ्यांचा पर्दाफाश होण्यासाठी एक जबाबदार माध्यम म्हणून ‘दिव्य मराठी’ने सिडको एन- ७ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. २५ वर्षीय सुजित अशोक सोनवणे आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधात कसून चौकशी व्हावी, असे तक्रारीत नमूद केले अाहे.

गरज नसतानाही रेमडेसिविरचे डाेस दिल्याचा ठपका

‘एचआरसीटी स्कोअर २५ पैकी १० च्या पुढे असेल तरच रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले पाहिजे,’ अशा स्पष्ट सूचना राज्य सरकारच्या टास्क फोर्सने डाॅक्टरांना दिलेल्या अाहेत. अन्यथा कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला अाहे. मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनीही जागतिक आरोग्य संघटना अाणि इंडियन काैन्सिल फॉर मेडिकल रिसर्चचा हवाला देऊन एका कार्यशाळेत डाॅक्टरांना तसे निर्देश दिले हाेते. या निर्देशांची अंमलबजावणी सर्व खासगी रुग्णालयांनी करणे बंधनकारक आहे. मात्र रामकृष्ण हॉस्पिटलमध्ये २, ५, आणि ६ स्कोअर असलेल्या रुग्णांना ५ ते ६ रेमडेसिविर देण्यात आल्याची नोंद कागदपत्रांवरून दिसून अाली. औषध निरीक्षक बजाज यांनी तपासणी झाल्यानंतर ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीला ही माहिती दिली.

गुन्हे शाखेचे अधिकारी व अन्न व आैषध प्रशासनाच्या पथकाने रामकृष्ण हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉ. हंबर्डे यांची चौकशी केली.

... असा जाळ्यात अडकला सुजित
सुजित हा मेडिकल स्टोअर्सच्या मालकांना चढ्या दराने इंजेक्शन विक्री करत असल्याची माहिती ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीला १३ एप्रिल रोजी मिळाली होती. त्यानंतर सुजितच्या मोबाइल क्रमांकावर ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने व्हाॅट्सअॅपद्वारे चॅटिंग करण्यात सुरुवात केली. १५ एप्रिल रोजी इंजेक्शन हवे असल्याचे म्हटले. मात्र तो अनेक दिवसांपासून टाळाटाळ करत होता. पण सोमवारी दुपारी दोन वाजता पाच इंजेक्शन देण्याचे त्याने कबूल केले होते. १ लाख ५० हजार रुपये रोख घेऊन आले तरच इंजेक्शन देणार असल्याचे त्याने म्हटले होते. त्याला विश्वास बसावा म्हणून ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने सुमारे महिनाभर व्हॉट्सअॅपवर प्रोफाइल फोटो म्हणून औषधांचा डीपी ठेवला होता. शिवाय मोठ्या भावाचे जळगावला कोविड हॉस्पिटल असून त्यांना इंजेक्शन नेऊन द्यावे लागतात, असे सांगितल्यामुळे सुजित इंजेक्शन देण्यास तयार झाला होता.

पाेलिसी खाक्या दाखवताच सुजितने घेतले डाॅ. हंबर्डेंचे नाव
पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर सुजितने एन-५ येथील रामकृष्ण हॉस्पिटलचे संचालक तथा बालरोग शल्यचिकित्सक डॉ. संदीप हंबर्डे यांचे नाव घेतले. तेच आपल्याला पाच रेमडेसिविर देणार होते, त्याची अापण विक्री करणार हाेताे, असे त्याने पाेलिसांना सांगितले. त्याच्या कबुलीवरून गुन्हे शाखेचे पथक नंतर रामकृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांनी डॉ. हंबर्डे यांची कसून चौकशी केली. मात्र त्यांच्याकडे इंजेक्शन सापडले नाही. सुजितने मात्र याच डॉक्टरांकडून मला इंजेक्शन मिळणार होते, असे डॉ. हंबर्डे यांच्यासमक्ष सांगितले. डाॅ. हंबर्डे यांनी मात्र या अाराेपाचे खंडन केले.

घटनेच्या वेळी डाॅ. हंबर्डेही बजरंग चाैकात
पोलिसांनी बजरंग चौकातून सुजितला ताब्यात घेतले त्या वेळी डॉ. हंबर्डेदेखील बजरंग चौकापासून ५० फूट अंतरावर हजर होते. टीव्हीएस व्हेगा (एमएच २० सीडी ४७८०) या स्कूटरवरून ते आले होते. पाेलिसांनी सुजित आणि डॉ. हंबर्डे यांची वेगवेगळी आणि एकत्र अशी दोन वेळा कसून चौकशी केली. त्या वेळी डॉ. हंबर्डे यांनी आपण बजरंग चौकात सासऱ्याच्या घरी आलो होतो, असे मान्य केले. ‘माझ्याकडे तीन कोविड रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी मलाच इंजेक्शन मिळत नाहीये. तर मी विक्री कशी करू शकतो..?’ असा सवाल करत त्यांनी सुजितच्या अाराेपाचे पुन्हा खंडन केले. दरम्यान, सुजितला ताब्यात घेतले त्या वेळी त्याला माेबाइलवर सहकाऱ्याचे वारंवार फाेन येत हाेते, मात्र तोपर्यंत सुजितचा मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतला होता. अाता हा नंबर काुणाचा हाेता याचा पाेलिस शाेध घेत अाहेत.

बातम्या आणखी आहेत...