आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दर्जेदार आणि विचारप्रवर्तक, वैविध्यपूर्ण विषयांनी नटलेल्या ‘दिव्य मराठी’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन १३ नोव्हेंबर रोजी प्रख्यात मधुमेहतज्ज्ञ आणि घाटी रुग्णालयातील प्रिव्हेंटिव्ह अँड कम्युनिटी मेडिसिन विभागप्रमुख प्रा. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या हस्ते होत आहे. कला, साहित्य, चित्रपट आणि राजकीय घडामोडी तसेच सामाजिक स्थित्यंतरे अशा विविध विषयांची मांडणी असणाऱ्या दिवाळी अंकाची परंपरा ‘दिव्य मराठी’ने गेल्या नऊ वर्षांत तयार केली. विविध मान्यवर संस्थांकडून या अंकाला पुरस्कारही मिळाले आहेत. लक्षवेधी मुखपृष्ठ हेही या अंकाचे वैशिष्ट्य असते. यंदाही असाच सकस अंक तयार झाला आहे. जगभरातील मधुमेहींचे जीवन केवळ आहारशैलीतील बदलाने आरोग्यदायी करणारे प्रा. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन होणार आहे. ‘दिव्य मराठी’च्या औरंगाबादेतील कार्यालयात १३ रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित सोहळ्यात हे प्रकाशन होईल. त्यास ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे, सीओओ निशित जैन यांची प्रमुख उपस्थिती असेल.
कोरोना ते मिम्सची मनोहारी दुनिया
या दिवाळी अंकात ‘महामारी कोरोनाची आणि माहितीचीही’ हा ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे यांचा कोरोना संकटाची वेगळी मांडणी करणारा लेख वाचण्यास मिळेल. याशिवाय गौरी कानेटकरांचा ‘लॉकडाऊन काळातील नोंदी’, अक्षय शेलार यांचा ‘इस्लामोफोबिया नावाचा व्हायरस’ हे सखोल माहितीचे लेख आहेत. प्रमोद चुंचूवार यांच्या ‘महाराष्ट्राच्या राजकारणाचं हॅपनिंग’ आणि सुधीर सूर्यवंशी यांच्या ‘अस्थिरता हाच ठाकरे सरकारच्या स्थिरतेचा पाया’ या लेखातील राजकीय भाष्य वाचकांना नवी चालना देणारे ठरेल. प्रख्यात क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे ‘कलंक नहीं, इज्जत है काजल पिया’ हे ललित, प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांचे ‘नट तो येणेचि नटावा’ हे लेखही या दिवाळी अंकाचे आकर्षण आहेत. सॅबी परेरा यांचा ‘मिम्सच्या मनोहारी दुनियेत’ हा लेख नव्या दुनियेची ओळख करून देणारा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.