आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:750 कुटुंबीयांना निम्म्या भावात साखर वाटून दिवाळी गोड, औरंगाबाद शहराजवळील आदर्श गाव पाटोद्याचा स्तुत्य उपक्रम

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटोद्यात ग्रामस्थांना अर्ध्या किमतीत साखरेचे वितरण करण्यात आले. - Divya Marathi
पाटोद्यात ग्रामस्थांना अर्ध्या किमतीत साखरेचे वितरण करण्यात आले.
  • या गावात शंभर टक्के कर भरणाऱ्यांना मोफत दळण, पिण्याचे शुद्ध पाणी व गरम पाणीही मोफत दिले जाते

आदर्श गाव म्हणून नावलौकिक मिळवलेल्या औरंगाबादजवळील पाटोदा ग्रामपंचायतीने गावातील ७५० कुटुंबीयांना अर्ध्या किमतीत म्हणजेच २० रुपये किलोप्रमाणे प्रतिकुटुंब २५ किलो साखर वाटून ग्रामस्थांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाचे संकट घोंगावत असताना सर्व ग्रामस्थांनी १०० टक्के कर भरल्याने त्यांना ही गोड भेट देण्यात आल्याचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा हे गाव औरंगाबादपासून १२ किलोमीटरच्या अंतरावर आहे. पेरे पाटील यांच्या कल्पनेतून अनोखी दिवाळी साजरी करण्याचा निश्चय करण्यात आला होता. बाजारात ४० रुपये किलोप्रमाणे मिळणारी साखर पेरे यांनी लातूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून २८ रुपये किलोप्रमाणे १०० क्विंटल विकत घेतली. यासाठी ग्रामपंचायतीला ३ लाख रुपयांचा खर्च करावा लागला. कारखान्याकडून साखर घेतल्यानंतर वाहतूक खर्च धरून ग्रामपंचायतीला ३० रुपये किलोप्रमाणे साखर मिळाली. जमा झालेल्या कराच्या रकमेतून प्रतिकिलोमागे १० रुपयांची भरपाई करत ही साखर ग्रामस्थांना वाटण्यात आली. याबाबत बोलताना ग्रामविकास अधिकारी पी. एस. पाटील म्हणाले की, कोरोनामुळे गावकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. दिवाळीसारखा सण गोड व्हावा, या उद्देशाने साखरवाटपाचा उपक्रम राबवला. यासाठी प्रशासक कमल मगरे, माजी सरपंच भास्कर पाटील पेरे, माजी उपसरपंच विष्णू राऊत यांनी परिश्रम घेतले.

ग्रामस्थ अॅडव्हान्समध्ये भरतात कर :

पाटोद्याची एकूण लोकसंख्या १६५४ इतकी आहे. गावात ७५० कुटुंबे आहेत. येथे एप्रिल महिन्यातच अॅडव्हान्समध्ये ७० टक्के कर जमा होतो. उर्वरित ३० टक्के कर मे, जून महिन्यात जमा केला जातो. कमीत कमी ४ हजार कर एका कुटुंबाला लागतो. घराच्या क्षेत्रफळानुसार हा कर वाढत जातो. वर्षाला ग्रामपंचायतीकडे ३० लाखांचा कर जमा होतो. यातूनच लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात.

काय आहे गावचे वैशिष्ट्य

> शंभर टक्के कर भरणाऱ्यांना मोफत दळण, पिण्याचे शुद्ध पाणी व गरम पाणीही मोफत दिले जाते.

> लोकसहभागातून विद्यार्थ्यांना हिवाळ्यात मोफत दूधवाटप.

> गावात पिण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थंड पाण्याचा पुरवठा करणारे कूलर बसवले आहेत.

> पर्यावरण ग्रामसमृद्धी योजनेद्वारे लोकसंख्येच्या दुप्पट फळझाडांची लागवड करण्यात आली आहे.

> जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ई-लर्निंग सुविधा उपलब्ध आहे.

> लोकसहभागातून सामाजिक जागृती सप्ताह आणि सामुदायिक विवाह.

बातम्या आणखी आहेत...