आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणातला आहार:दोन दिवसांपेक्षा जास्त उपवास नको, साबुदाणा खाणे टाळा

औरंगाबाद / रोशनी शिंपी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण सुरू होताच अनेकांचे उपवास सुरू होतात. विशेषत: महिलांची संख्या असे उपवास करण्यात जास्त असते. मात्र, काही जण या काळात दिवसभर उपाशीच राहतात तर काही जणांच्या आहाराचे प्रमाण वाढते. मुळात उपवासाच्या काळात आहाराविषयी जागरूकता नसल्याने बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, अपचन आणि डोकेदुखीचे आजार वाढल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे सलग दोन दिवसांपेक्षा जास्त उपवास करूच नका. साबुदाणा व शेंगदाणा खाणे टाळा, असा सल्ला आहारतज्ज्ञ वैशाली भालेराव यांनी दिला.

वैशाली यांच्या मते, कधी तरी उपवास करणे ठीक पण सातत्याने व वारंवार उपवास करणे आरोग्यासाठी धोकादायकच असते. काही जण उपवासाच्या दिवशी चटपटीत पदार्थ खाण्यावर भर देतात. पण त्यामुळे पोटाला आराम देणे, वजन कमी करण्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जातो. उलट चटपटीत पदार्थ खाल्ल्याने आपण आरोग्य खराब करून घेतो. या काळात साबुदाणा प्रामुख्याने टाळला पाहिजे. कारण यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असतात, त्याचे साखरेत रूपांतरण होते. यामुळे जास्त प्रमाणात साबुदाणा सेवन करणाऱ्याचे काही दिवसांत वजन वाढलेले असते.

भगर, दही, सुकामेवा, फळे योग्य उपवासाच्या दिवशी आहारात भगर, राजगिरा, फळ, दूध, दही, ताक आणि सुकामेवा यांचा मर्यादित प्रमाणात समावेश असावा. कारण, यामध्ये स्टार्च नाही. शेंगदाणा नसल्याने तेलाचे प्रमाणही कमी असते. ताक आणि दह्याचे सेवन केल्यास दिवसभर पचन चांगले होते. फळाचे सेवन केल्यास तंतुमय पदार्थ पोटात जाऊन ते साफ होते.

साबुदाणा वडे, वारंवार चहा घेणे अयोग्य
साबुदाण्यात स्टार्च असल्याने त्याचे तत्काळ साखरेत रूपांतर होते. शिवाय हा पदार्थ तंतुमय नसल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास अधिक होतो. उपवासामुळे पाणी कमी प्रमाणात पिण्यात येते. त्यामुळेही शौचास त्रास होतो. साबुण्यात शेंगदाणा आणि साबुदाणा वड्यात तेल असल्याने शरीरावर वाईट परिणाम होतात. उपवासाच्या नावाखाली चहा अधिक पिला जातो, त्याचेही दुष्परिणाम होतात. त्यामुळे चहाचे प्रमाण कमीच असावे.

एकवेळ जेवण, एक वेळ फलाहार चालेल
बीपी, शुगरचे आजार असलेल्यांनी खरे तर उपवास करणे टाळले पाहिजे. आजार नसलेल्या व्यक्तीने मात्र उपवास करण्यास हरकत नाही. त्यामुळे पोटालाही आरात मिळतो. पण, त्यांनीही एक वेळ जेवण आणि एक वेळ फलाहार करणे योग्य राहील. साबुदाण्यामुळे बद्धकोष्ठता वाढते. महिनाभर साबुदाणा खाल्ल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते.
- दीपाली पाठक, आहारतज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...