आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीन वर्षे होऊन गेली तरी शहरासाठी होणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती काही मिळत नाही. मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी थेट या कंपनीला जाब विचारला, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती नेमण्यात आली तरीही कामाला गती मिळालेली नाही. अखेर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी, ‘या कामाला गती दिली नाही तर जीव्हीपीआर कंपनीच्या राज्यातील आणि देशभरातील कामांवर निर्बंध आणू,’ असा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हे काम दिले.स्मार्ट सिटी कार्यालयात कामाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी बैठक झाली. या बैठकीला अतुल सावे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड, मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. बी. काजी, अन्य अधिकारी उपस्थित होते.
नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम आतापर्यंत केवळ १८ ते २० टक्केच झाल्याचे स्पष्ट झाले. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम केले जात आहे. हे अंतर ३९ किलोमीटर असून आतापर्यंत १२ किमी जलवाहिनी टाकल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रोज १५० मीटर जलवाहिनी टाकली गेली पाहिजे, पण प्रत्यक्षात १०८ मीटरचेच काम होत आहे. ११ पैकी चारच जलकुंभांची कामे प्रगतिपथावर : लालापोड म्हणाले की, ‘मार्चअखेरपर्यंत ११ जलकुंभांचे बांधकाम करून ते महापालिकेच्या स्वाधीन करण्याचे ठरलेले आहे, तसे कंपनीने उच्च न्यायालयातही मान्य केले आहे, पण चारच जलकुंभांची कामे प्रगतिपथावर असल्याचे समोर आले आहे. दोन हजार किलोमीटर लांबीची अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे कामही संथगतीने सुरू आहे. जायकवाडी धरणात क्रॉफर्ड डॅमचे काम मार्चअखेरीस पूर्ण होईल, एप्रिलपासून जॅकवेलचे काम सुरू होईल.
कामात प्रगती काहीच नाही : आमदार अतुल सावे सहकारमंत्री अतुल सावे म्हणाले, ‘माझ्या कार्यालयाकडून दर पंधरा दिवसांनी जलकुंभांच्या कामाच्या प्रगतीचे फोटो काढले जातात, पण प्रगती काहीच दिसून येत नाही. यावर लोलापोड यांनी कंत्राटदार कंपनीला १५८ कोटींचे पेमेंट करायचे आहे असे सांगितले. त्यावर सावे म्हणाले, निधीचा प्रश्न नाही. जलकुंभांच्या कामावरचे मजूर वाढवा. जीव्हीपीआर कंपनीचे निर्णय अधिकारी अग्रवाल यांनी जलकुंभाच्या कामासाठी मजूर उत्तर प्रदेश, बिहारहून आणतात असे सांगितले. त्यावर डॉ. कराड यांनी वेळेत जलकुंभांचे काम झाले नाही तर उन्हाळ्यात लोक बसू देणार नाहीत, असी टिप्पणी केली. लोलापोड म्हणाले, क्रॉफर्ड डॅमच्या कामासाठी तज्ज्ञांना बोलवा, असे १५ दिवसांपासून सांगत आहोत, पण त्यांना बोलावले जात नाही.
बैठक घेण्याची सूचना आतापर्यंत तीन – चार आढावा बैठका झाल्या, पण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी एकाही बैठकीला आले नाहीत. हे अधिकारी कोण आहेत याचा शोध घ्या आणि त्यांच्यासह येत्या पंधरा दिवसांत बैठक घ्या, असे निर्देश डॉ. कराड यांनी एमजीपीच्या अधिकाऱ्यांसह यश इनोव्हेशन सोल्युशन्सचे समीर जोशी यांना दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.