आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यातील सर्वात अत्याधुनिक, खासगीपेक्षा उच्च दर्जाच्या सुविधा घाटीतील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यात ४० कोटी रुपयांची यंत्रसामग्री आहे. पण तीन वर्षांपासून २२२ जणांच्या भरतीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या स्तरावर कुलूपबंद करण्यात आला. यात किमान १०० डॉक्टरांचा समावेश आहे. भरतीच नसल्याने १५० कोटी रुपये खर्चून बांधलेले हे हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत येऊ शकलेले नाही. सुपरस्पेशालिटीच्या हृदयरोग विभागात फक्त अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफीची तपासणी एका डॉक्टरांमार्फत सुरू आहे. लोकांची गरज शस्त्रक्रियेची आहे. पण तज्ज्ञ डॉक्टरांच्या भरतीसाठी प्रशासकीय पातळीवर केवळ टोलवाटोलवी सुरू असल्याने निर्णय होत नाही.
पाच महिन्यांपासून अँजिओग्राफीला मुहूर्त नाही : सुपरस्पेशालिटीमध्ये सध्या हृदयरोग विभागाची ओपीडी (बाह्य तपासणी) सुरू आहे. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीचा मुहूर्त लागत नाही. विविध कारणे देत प्रशासनाच्या वतीने शस्त्रक्रियांसाठी टाळाटाळ केली जात आहे. सुपरस्पेशालिटीत अत्याधुनिक कॅथलॅब तयार आहे. वाढीव दहा लाख रुपयांचे साहित्य खरेदीची तयारी होत आहे. परंतु, गरिबांच्या सेवेसाठी सर्व यंत्रणा तयार असतानाही हे दोन प्रकारचे उपचार होत नाहीत. आश्वासनांशिवाय काहीही होत नाही. सुपरस्पेशालिटीसाठी लागणाऱ्या नर्सची (परिचारिका) कंत्राटी पद्धतीने भरतीबाबतही घाटी प्रशासनाकडून कुठलीही हालचाल होताना दिसत नाही.
अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफीची फक्त तपासणी
चार सहायक प्राध्यापक पदे तातडीने भरा : डॉ. चौधरी
सुपरस्पेशालिटी विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांनीही ऊर शल्यचिकित्सा विभाग (सीव्हीटीएस), मूत्र शल्यचिकित्साशास्त्र विभाग, नवजात अर्भक विभाग, हृदयरोग चिकित्साशास्क्ष या चारही विभागात एक सहायक प्राध्यापक अशी चार पदे करार तत्त्वावर भरण्याची मागणी केली आहे.
विभागीय निवड मंडळाकडून जाहिरात देणार
सुपरस्पेशालिटीच्या चार सहायक प्राध्यापकांची पदे करार पद्धतीने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी विभागीय निवड पद्धतीच्या माध्यमातून जाहिरात देऊन ही पदे भरण्यात येतील. तसेच अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी शस्त्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.-डॉ. वर्षा रोटे, प्रभारी अधिष्ठाता, घाटी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.