आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका:द्वेषाचे राजकारण करून भुंकणाऱ्यांना घाबरू नका, त्यांना प्रेमानेच उत्तर द्या- एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयएमचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे नाव न घेता टीका केली. औरंगाबादेतील सभेत ते म्हणाले, ‘मी येथे कुणाला वाईट म्हणण्यासाठी आलेलो नाही. काही लोक द्वेषाचे राजकारण करत आहेत, त्यांना घाबरू नका. त्यांच्या जाळ्यातही अडकू नका. त्यांच्या द्वेषाला प्रेमानेच, हसत प्रत्युत्तर द्या. ज्यांना घरातून काढून देण्यात आले आहे त्यांच्यावर आपण काय बाेलावे? माझ्या पक्षाकडे खासदार आहेत, तुमच्याकडे काय आहे? ज्यांची हैसियत नाही त्यांच्यावर बाेलण्यात काहीच अर्थ नाही,’ अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंवर जाेरदार टीका केली.

ओवेसी यांच्या शिक्षण संस्थेतर्फे हैदराबादेत अद्ययावत शाळा सुरू करण्यात आली आहे. सुमारे १५ कोटी रुपये खर्च करून औरंगाबादेतही या संस्थेतर्फे चांगल्या दर्जाची शाळा उभारली जाणार आहे. त्याचे भूमिपूजन ओवेसींच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात ते बाेलत होते. या शाळेत सर्व जातीधर्माच्या लोकांना प्रवेश मिळेल, गरिबांना माेफत शिक्षण दिले जाईल, अशी घाेषणाही ओवेसींनी केली. या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील, माजी आमदार वारिस पठाण, गफार कादरी, तेलंगणाचे आमदार जाफर हुसेन, सय्यद मोईन, नसीर रियाज आदी उपस्थित होते.

मुस्लिम समाजाला उद्देशून ओवेसी म्हणाले, ‘औरंगाबादमध्ये येऊन द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना मी लवकरच आमखास मैदानात येऊन उत्तर देणार आहे. द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना घाबरू नका. एकजूट दाखवा, हीच आपली ताकद आहे. कुत्रा सध्या भुंकत आहे. त्याचे कामच भुंकणे आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका.’

ओवेसी म्हणाले की, ‘गोपालसिंग कमिशन असो की सच्चर कमिटीचा अहवाल यात मुस्लिम सर्वात पिछाडीवर, कमजाेर असल्याचे दिसते. अशा लोकांना मजबूत बनवण्याचे काम लोकप्रतिनिधींचे आहे. राष्ट्रनिर्मिती केवळ एका धर्माने होत नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारशी, बौद्ध या सर्वांमुळे राष्ट्र बनते. एका धर्माचा विकास करून देश सुपरपॉवर बनवण्याचा कुणी विचार करत असेल तर तो मूर्खपणा ठरेल, असे मतही ओवेसी यांनी व्यक्त केले.

देशात एकुण उच्चशिक्षित मुस्लिमांचे प्रमाण सर्वात कमी आहे. राज्यात २०१९-२० नुसार एकुण ४२ लाख ६५ हजार ४७२ उच्चशिक्षीत असून त्यामध्ये मुस्लिमांची संख्या फक्त १ लाख ६६ हजार २२८ इतकी आहे. हे प्रमाण केवळ ३.८९ टक्के आहे. ही चिंताजनक बाब आहे. महाराष्ट्रात पदवी घेणाऱ्यांची मुस्लिमांचे प्रमाण केवळ चार टक्के आहे. राज्यात ४६ टक्के मुस्लीम मुले उर्दु शाळेत शिकत आहेत. मात्र ५० टक्के उर्दु शाळेत फर्निचर नाहीत. ९० टक्के शाळेत संगणक, लायब्ररी नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

दोन एकर जागेवर उभारणार पाच मजली शाळा
औरंगाबादेतील हिमायतबागच्या शेजारी दोन एकर जागेवर पाच मजली शाळा उभारली जाणार आहे. या शाळेत केजी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल. गरिबांना माेफत शिक्षण मिळेल. केवळ मुस्लिमच नव्हे तर कोणत्याही धर्माच्या विद्यार्थ्यासाठी या शाळेचे दरवाजे उघडे असतील. हैदराबादेतील आमच्या शाळेत श्रीमंतांना लाजवतील अशा सुविधा दिल्या आहेत, त्याच सुविधा येथील शाळेतही दिल्या जातील, असा दावा ओवेसी यांनी केला. तर खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ‘या शाळेतून चांगले इंजिनिअर, डॉक्टर तयार होतील.’

खुलताबाद दर्ग्यात चादर
आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी सकाळी पाणचक्कीत भेट दिली. तेथून ते खुलताबादकडे रवाना झाले. दौलताबाद येथील युवकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. खुलताबाद शहरात पाेहोचल्यानंतर सुफी संत दर्गा हजरत शेख मुन्तजिबोद्दीन जरजरी जर बक्ष, बाबा बुऱ्हाणुद्दीन औलिया, औरंगजेब समाधी व दर्गा हजरत सय्यद जैनोद्दीन शिराजी येथे भेटी दिल्या. खा. इम्तियाज यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी भगवा रुमाल गळात टाकला होता. ‘भगवा, निळा, हिरवा हे सर्वच रंग आमचे आहेत. त्यावर कुणी एकाने दावा करू नये,’ असे उत्तर इम्तियाज यांनी पत्रकारांना दिले.

बातम्या आणखी आहेत...