आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन समाजांमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी काही जण विष कालवत आहेत. मात्र त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. त्याला बळी पडू नका. देशाच्या विकासासाठी बंधुभावाने काम करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. शांतता आणि प्रेमाचा संदेश देऊन राष्ट्रनिर्माणासाठी एकमेकांना साथ देत काम करा, असे आवाहन मंगळवारी छावणी येथील ईदगाह मैदानावर करण्यात आले.
ईद-उल-फित्रचा सण मंगळवारी मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरा केला. कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी छावणी येथील ईदगाह मैदानावर लाखो मुस्लिम बांधव एकत्र जमले होते. बुढीलेन येथील जामा मशिदीचे इमाम हाफिज जाकीर यांनी नमाजची इमामत केली. नमाजच्या अगोदर मौलाना मुफ्ती नईम यांनी रमजानचे महत्त्व सांगितले. ज्याप्रकारे तुम्ही रमजान महिन्यामध्ये रोजे ठेवून इबादत केली, त्याच पद्धतीने आयुष्यभर इबादत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. जमाते इस्लामी हिंदचे ज्येष्ठ पदाधिकारी जावेद मुकर्रम यांनी सांगितले की, इस्लाम धर्माच्या संदेशानुसार आपण जीवन व्यतीत केले पाहिजे. युवकांनी चांगले शिक्षण घेऊन डॉक्टर, वकील, शास्त्रज्ञ बनले पाहिजे. त्यामुळे त्यांना देशाची सेवा करण्याची संधी मिळेल.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून ईदची नमाज मुस्लिम बांधवांना घरातच अदा करावी लागत होती. यंदा मात्र महामारीचे संकट टळल्याने शहरातील विविध भागांतील मशिदींमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली. आबालवृद्धांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या. शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.