आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजीराजे आक्रमक:मराठा आरक्षणाच्या पोकळ घोषणा नकोय, प्रत्यक्ष कृती करा; सत्ताधारी व विरोधकांना खासदार छत्रपती संभाजीराजेंचे आवाहन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • मराठा क्रांती मोर्चाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संभाजीराजे

कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा आज माजी मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचे काय झाले? त्यासाठी काय करत आहात? कधीपर्यंत आरक्षण देताय, हे समाजाला सांगा. त्यांना वेठीस धरून रस्त्यावर उतरायला लावू नका. आता घोषणा नकोय, लवकरात लवकर प्रत्यक्ष कृती करा, असे छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना सत्ताधारी व विरोधकांना आवाहन केले आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने शांततेत 58 मोर्चे कढून सरकारचे लक्ष वेधले होते. पण आजही प्रलंबित मागण्या जैसे थे आहेत, यामुळे मराठा समाज संतप्त झाले आहे. यावर विचार विनमय करून पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या 5 व्या वर्धपान दिनानिमित्त हर्सूल येथील मधुरा लॉन्समध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवरायांच्या जय घोषाने मेळाव्याची सुरुवात झाली होती. मेळाव्यात मराठा समन्वयकांनी सरकार विरोधात रणशिंग फुंकण्याची घोषणा केली.

दुजाभावा विरोधात, ओबीसी, मराठा वाद निर्माण करणाऱ्यांविरोधात संतप्त प्रतिक्रया उमटल्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजी राजे पुढे बोलताना म्हणाले की, १९०२ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी वंचित बहुजनांना आरक्षण लागू केले होते. पण गोरगरीब मराठा समाजाला यापासून वंचित ठेवण्यात आले. त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी मी २००७ पासून प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र पिंजून काढला आहे. संसदेत सर्वप्रथम मराठा आरक्षणासाठी मीच आवाज उठवला. १२७ वी घटना दुरूस्तीवर परखड मत मांडले. उर्वरित खासदार गप्प होते. त्यांनी असे तोंडावर बोट ठेवायला नको. आगरा दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबच्या दरबारात अन्याय विरोधात आवाज उठवला होता. तसेच मराठा समाजावर होणाऱ्या अन्याय विरोधात मी संसदेत एकटा बोललो व पुढेही बोलत राहील. तुम्ही कोणत्याही पक्षात असू द्या, समाजासाठी मात्र, एकत्रित येण्याची त्यांनी आवाहन केले.

मी सर्वांसोबत
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिव धर्म यात्रा काढली होती तेव्हा त्यांच्या सोबत होतो, आजही आहे. जेथे शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे व समाजहिताचे काम आहे तेथे मी सर्वांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना इतिहासाबाबत प्रश्न विचारले पाहिजे असेही ते म्हणाले.

कृती करा
फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की, इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. तसेच विद्यमान मुख्यमंत्री ठाकरे यांनी तिच घोषणा केली. त्यामुळे आपण आरक्षण कशातून हवे हे सांगत बसू नका व मतभेद न ठेवता, त्या सत्ताधारी व विरोधकांनी बोलल्याप्रमाणे कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे आवाहन केले.

आरक्षणाच्या पलिकडे विचार करा
सारथीवर लक्ष केंद्रित करावे. कल्याणकारी योजना समजून त्याचा जास्तीत जास्त विद्याथ्यांनी लाभ घ्यावा. केवळ ५०० आणि हजार कोटींचे पॅकेज मागून काहीच साध्य होणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय हवे, याचा प्लॅन तयार करा व निधी मागा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तेच सांगितले व निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली आहे. त्यानुसार कृती करण्यासाठी आम्ही सर्वांनी काम केले पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी केवळ निधी मागणाऱ्यांचे चांगले कान टोचले.

दयनीय अवस्था दूर करा
अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाला अनेक महिन्यांपासून अध्यक्षच नाहित. जाचक नियम व अटीमुळे योजना थंडबस्त्यात पडली आहे. ही दयनीय अवस्था सरकारने तातडीने दूर केली पाहिजे.

वस्तीगृहच्या उद्धघाटनाचे काय झाले
मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण, पालकमंत्री म्हणाले होते १४ व १५ ऑगस्टला वस्तीगृहाचे उद्धघाटन करणार म्हणून, प्रत्यक्ष कृती शून्य आहे. कोपर्डीच्या घटनेतील आरोपींना फाशी झालेली नाही. असे एक नव्हे सर्वच प्रश्न आजही कायम असल्याने समाज संतप्त झालेला आहे. त्यामुळे सरकारने अंत न पाहता उक्ती प्रमाणे कृती करावी, असे संभाजीराजे म्हणाले.

मेळाव्यातील ठराव
ऑल्मपिकमध्ये सूवर्ण पदक पटकावणाऱ्या खेळाडुंच्या अभिनंदन, कोपर्डीतील नराधमांना तातडीने फाशी द्यावी. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे. ५० टक्क्यांची मर्यादा वाढवावी. एमपीएससी रिक्त सदस्य पद भरावेत, बार्टिच्या धरर्तीवर सारथीला व अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला निधी मिळावा, ६०५ कोर्सेसमध्ये शिष्यवृत्ती मिळावी, आदी ठराव घेण्यात आले. तसेच संभाजीराजेंच्या हस्ते वस्तीगृह, महिला सुरक्षेसाठी स्टिकरचे विमोचन करण्यात आले. लवकरच हेल्पलाईन नंबर स्टिकरवर प्रसिद्ध केले जाणार आहेत.

मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे जीआरची होळी
मराठा आरक्षणासह विविध कल्याणकारी निर्णय सरकारने घेतले होते. प्रत्यक्षात त्याचा कोणताच लाभ विद्यार्थ्यांना होत नाही. मराठा आरक्षण रद्द झाले आहे. पुढे काय, याबाबत सरकार गप्प आहे. कोपर्डीतील आरोपींना फाशीची शिक्षा झालेली नाही. यासह सर्वच प्रश्नांकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. याच्या निषेधार्थ मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे १९ ऑगस्ट रोजी पैठण गेट येथे फसव्या जीआरची होळी करण्यात आली व सरकार विरोधात घोषणा, निदर्शने आंदोलन करण्यात आले. समन्वयक रमेश केरे पाटील, अप्पासाहेब कुढेकर पाटील, राहुल पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...