आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती विशेष:धर्मांतर करण्यापूर्वी बाबासाहेबांनी औरंगाबादेतच केले सर्वाधिक वाचन, चिंतन; त्यांनी खरेदी केलेल्या एकूण 1004 पुस्तकांचा संग्रह ग्रंथालयात

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वीलेखक: शेखर मगर
  • कॉपी लिंक
  • बौद्ध, हिंदू, ख्रिश्चन, पारशी, इस्लाम धर्मांच्या वाचलेल्या पुस्तकांचा ऐतिहासिक ठेवा ‘मिलिंद’मध्ये,

औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत: खरेदी केलेल्या अन् वाचलेल्या १००४ पुस्तकांचा अनमोल ठेवा जतन केलेला आहे. त्यांनी वाचलेले बहुतांश ग्रंथ धार्मिक, सामाजिक, अाध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानाशी निगडित आहेत. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी नागपुरात धर्मांतर केले. पण धम्मदीक्षेपूर्वी केलेल्या सर्व धर्मांच्या अभ्यासाच्या खाणाखुणा या ग्रंथसंपदेमध्ये दिसून येतात. त्यांच्या वाचन, चिंतनाची साक्ष देणाऱ्या निवडक ग्रंथांत त्यांच्या हस्ताक्षरातील ऐतिहासिक नोंदीही आहेत. बौद्ध, हिंदू, पारशी, ख्रिश्चन, इस्लामपैकी सर्वाधिक ग्रंथ हिंदू धर्माचे वाचल्याचेही येथील दस्तऐवजावरून स्पष्ट होते.

“मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते. पण मी हिंदू म्हणून मरणार नाही ते मात्र माझ्या हातात आहे.’ धर्मांतराची इच्छा प्रकट करणारी ही घोषणा बाबासाहेबांनी येवल्याला (१३ ऑक्टोबर १९३५) केली होती. पुढे नागपूर येथे (१४ ऑक्टोबर १९५६ ) त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन अनुयायांनाही बौद्ध बनवले. धर्मांतराची घोषणा ते धम्मदीक्षा या २१ वर्षांच्या कालखंडात बाबासाहेबांनी जैन, शीख, हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम आणि पारशी धर्मांचा सखोल अभ्यास केला होता, असे अनेक अभ्यासक, विचारवंत, साहित्यिक नेहमी सांगतात. याचे ऐतिहासिक पुरावे ‘मिलिंद’च्या ग्रंथालयात दडलेले आहेत. बाबासाहेबांच्या वाचन-चिंतनाच्या प्रवासात विविध धर्मांचे हजारो ग्रंथ त्यांनी अभ्यासले आहेत.

मिलिंद विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालयात एकूण २५ हजार ४५९ पुस्तकांचा संग्रह आहे. पण याखेरीज १००४ दुर्मिळ ग्रंथांचे स्वत: बाबासाहेबांनी खरेदी करून संंकलन केले आहे. हे सर्वच ग्रंथ त्यांनी वाचून त्यावर त्यांच्या हस्ताक्षरात टिपण काढल्याच्या नोंदी आढळतात. १९ जून १९५० रोजी ‘मिलिंद’ कॉलेज सुरू झाले. ‘बाबासाहेब रेल्वे प्रवासातही ग्रंथ वाचत होते.’ असे संदर्भ एस. एस. रेगे यांच्या “भीमपर्व’ या ग्रंथात आहेत. ‘मिलिंद’च्या बांधकामाच्या पाहणीसाठी येताना प्रवासात बाबासाहेब ग्रंथ वाचत होते, असे स्पष्ट होते.

औरंगाबादच्या वास्तव्यात १००४ ग्रंथसंपदेतील बहुतांश ग्रंथ बाबासाहेबांनी येथेच वाचून हातावेगळे केल्याचे स्पष्ट होते. धम्मदीक्षेपूर्वी त्यांचा ‘मिलिंद’ परिसरात जास्त वावर होता. त्या वेळी त्यांनी धर्मांतराच्या संदर्भात विपुल वाचन-चिंतन केल्याचे या ग्रंथांंवरून दिसते. कारण सर्वाधिक पुस्तके धर्मसंस्थेशी निगडित आहेत. ‘भगवद‌्गीता’ (१९४५), ‘प्राकृत श्रीमद भागवतार्थ दर्शन’, ‘सार्थ श्रीमद् भागवत’ (स्कंद-११-१२) (१९२०), रघुनाथशास्री कोकजे यांनी लिहिलेले ‘नवा आचारधर्म’ (१९३६), काशीनाथ वामन लेले लिखित ‘उपनयन विधी’, दप्तरी केशव लक्ष्मण लिखित ‘धर्मविवाह स्वरूप’, बॅक्युनिन मिशेल यांचे ‘गॉड अँड स्टेट’, लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांचे ‘आधिमौलिक सुधारणा आणि अाध्यात्मिक धारणा’, टाकी श्रीमंगेश रामचंद्र यांचे ‘श्रीकृष्णांचे सद्गुरू श्री दूर्वास’ (१९३८), ‘हिंदू कोडाचे कृष्ण कारस्थान अथवा सनातन धर्माचे संपूर्ण उच्चाटन’ (१८६५), गौड दुर्गाप्रसाद चौरासिया यांचे ‘भविष्य पुराण भाषा’, ‘ब्राह्मणोत्पती मार्त’, ‘पर्शियन पोयट्री’,”जातक संग्रह’ (१९३६), ‘रिबिल्डिंग द वर्ल्ड आऊटलाइन ऑफ प्रिन्सिपल ऑफ अॅनॅरिलिझम’, ‘विष्णुपुराण’, लाइफ अँड मिशन्स ऑफ समर्थ रामदास अँड अदर पँँफ्लेट्’ (१९१८), ‘बुद्धा अँड हिज गॉस्पेल’ (१९४६), ‘आर्ट अँड अॅर्केटेक्टिव्ह ऑफ इंडिया : बुद्धिस्ट-हिंदू-जैन’ ( १९५४) ‘हिंदू रिलिजन कस्टम्स अँड मॅनर्स’, ‘फाइव्ह स्टेजेस ऑफ ग्रीक रिलिजन’, ‘२५०० इयर्स ऑफ बुद्धिझम’ (१९५६), ‘द लाइफ ऑफ बुद्धा’, ‘ऑरिजिन्स ऑफ रिलिजन’ (१९४८), ‘फिलॉसॉफी, फाउंडेशन ऑफ रिलिजियस फिलॉसॉफी इन जैनिझम, ख्रिश्चनिटी अँड इस्लाम’, ‘लाइफ ऑफ जिसस’, ‘जिसस द सन ऑफ मॅन’ (१९२८), ‘वेदांता फॉर द वेस्टर्न वर्ल्ड’ (१९४८) आदींसह पाश्चात्त्य लेखकांनी लिहिलेले कुराण, बायबलदेखील बाबासाहेबांनी वाचलेले आहेत.

या निष्कर्षापर्यंत येऊ शकतो
बाबासाहेबांच्या ग्रंथसंपदेत सर्वाधिक ग्रंथ धर्माशी निगडित असतील तर त्यांनी येथेच सर्वाधिक वाचन-चिंतन केले असे म्हणण्यास वाव आहे. शिवाय एस. एस. रेगे यांचे ‘भीमपर्व’, बळवंत वराळे यांचे ‘डॉ. आंबेडकरांचा सांगाती’ आणि न्यायमूर्ती भालचंद्र वराळे यांच्या ‘परीस्पर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा’ या ग्रंथातील संदर्भाद्वारे आपल्याला तसा निष्कर्ष काढता येऊ शकतो. डॉ. एम. ए. वाहूळ, निवृत्त प्राचार्य, मिलिंद महाविद्यालय

येथे तत्त्वज्ञानही अभ्यासले
तत्त्ववेत्ता गॅलोवे यांचे ‘द फिलॉसॉफी ऑफ रिलिजन’, अॅटकिन्सन ली यांचे ‘ग्राउंड वर्क ऑफ फिलॉसॉफी ऑफ रिलिजन’, टी. जी. मसॅर्क लिखित ‘मॉडर्न मॅन अँड रिलिजन’, ‘फ्रीडम अँड द स्पिरिट’ अशी तत्त्वज्ञानावर लिहिलेल्या लेखकांची पुस्तके वाचली. ‘इव्हॉल्युशन ऑफ सिव्हिलायझेशन’, ‘इंट्रोडक्शन टू कंटेम्पररी सिव्हिलायझेशन इन द वेस्ट’, ‘रिकन्स्ट्रक्शन ऑफ ह्युमॅनिटी’ (१९४८)अशा पाश्चात्त्य नागरिकरणाच्या उत्क्रांतीविषयी ऊहापोह करणारे ग्रंथ अभ्यासले.

बातम्या आणखी आहेत...