आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ४१० संलग्नित महाविद्यालयांपैकी ३३६ महाविद्यालयांनी युवा महोत्सवात सहभाग घेतला नाही. त्याचे प्रमाण ५५.५६ आहे. वारंवार सांगुनही प्रसंगी १० हजार दंडाचा इशारा दिला. पण तरीही प्राचार्यांनी जुमानले नाही. म्हणून आता विद्यापीठाने ३३६ कॉलेजांना पुढील दोन दिवसांत नोटीस देण्याची तयारी केली आहे.
दोन वर्षांच्या खंडानंतर १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान विद्यापीठाचा युवा महोत्सव झाला. यंदा जास्तीत जास्त कॉलेजांनी सहभागी व्हावे, यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी खूप फॉलोप घेतला. ११ ऑक्टोबर २०२२ रोजी विद्यार्थी कल्याण मंडळाच्या बैठकीत १० हजारांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसे एका परिपत्रद्वारे प्रशासनाने इशारा दिला होता. तरीही अतिशय विदारक चित्र समोर आले आहे. प्राप्त आकडेवारीनुसार ४१० पैकी १८४ कॉलेजांनीच संघ पाठवले होते. त्यांच्या कलावंतांनी प्रत्यक्ष युवा महोत्सवात सहभाग घेतला. पण ६३ कॉलेज तर असे होते की, ज्यांनी फक्त नोंदणी केली.
या कॉलेजचे संघ विद्यापीठात दाखल झालेच नाही. २७३ कॉलेजांनी नोंदणी तर सोडाच विद्यापीठाच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवली आहे. त्यांनी एकाही एव्हेंटसाठी एकही कलावंत पाठवला नाही. अशा कॉलेजांवर आता कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. कॉलेजला टपालाद्वारे नोटीस पाठवली जाणार आहे. विशेष म्हणजे, नोटीस मिळाल्यानंतर पाच दिवसांत दंड भरावा लागणार आहे. दहा हजारांच्या दंडाबरोबरच अकॅडमिक ऑडिटच्या वेळी या कॉलेजांचे ५ गुण कापून घेऊ, असे कुलगुरूंनी म्हटले होते. त्याविषयी अद्याप काहीच स्पष्टता आलेली नाहीये.
स्वत:हुन सहभाग घेणे अपेक्षित
''यासंदर्भात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले सरांचे मार्गदर्शन घेतले आहे. त्यांच्या निर्देशानुसारच दंडाच्या नोटिसा दोन दिवसांत पाठवू. भाग न घेतलेल्या कॉलेजांच्या नोटिसा तयार आहेत. खरंतर त्यांनी स्वयंउत्स्फूर्तपणे सहभागी होणे अपेक्षित आहे. नोटीस मिळाल्यानंतर पाच दिवसांतच दंड भरावा लागेल.'' - डॉ. संजय सांभाळकर, संचालक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.