आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाच्या स्वीय सहाय्यक डॉ. सुनीता अंकुश सेवानिवृत्त ​​​​​​​:35 वर्षांमध्ये नोकरीसोबत PHD ही केली पूर्ण, विद्यार्थ्यांसाठी ठरल्या आदर्श

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्र-कुलगुरूंच्या स्वीय सहाय्यक डॉ. सुनीता राजेंद्र अंकुश 35 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्या आहेत. निवृत्त होतांना त्यांनी विद्यापीठातून ज्ञानाची प्रचंड मोठी शिदोरी सोबत घेतली आहे. बारावीनंतर नोकरी लागली, पण उच्चशिक्षण घेण्याच्या जिद्दीने त्यांना पछाडले होते. पदवी, पदव्युत्तर पदवी एवढेच नव्हे तर समाजशास्त्रात त्यांनी पीएचडीही केली आहे.

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतीमुळे समस्त स्त्रीयांना शिक्षण घेण्याचे बळ मिळाले. शिक्षणामुळेच आत्मभान प्राप्त होते, हे ओळखून असलेल्या सुनीता अंकुश यांनी सावित्रीबाई फुल्यांच्या शैक्षणिक क्रांतीचा हाच संदर्भ घेत सेवेत असताना मोठा पल्ला गाठला आहे.

जानेवारी- 1987 दरम्यान सुनीता अंकुश या रुजू झाल्या होत्या. त्यांनी लघुलेखकासह बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. नोकरीत रुजू झाल्यानंतर बीएसएनएलचे अभियंते राजेंद्र अंकुश यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वैवाहिक जीवन आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करत त्यांनी उच्चशिक्षण घेण्याचा घ्यास घेतला होता. म्हणून त्यांनी विद्यापीठ प्रशासनाची पुर्वपरवानगी घेऊन सेवेत असताना शिक्षण घेतले.

1992 दरम्यान बी. ए. तर 1997 दरम्यान समाजशास्त्रात एम. ए. केले. पुढे 2001 मध्ये त्यांनी पीएचडीसाठी नोंदणी केली. साडेपाच वर्षांतच त्यांनी ‘शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिलांच्या समस्या : एक चिकित्सक अभ्यास’ या विषयात संशोधन केले. डॉ. स्मिता अवचार यांनी त्यांना मार्गदर्शन केले. एवढ्यावरच सुनीता अंकुश थांबल्या नाहीत, तर त्यांनी दोन ग्रंथही लिहिले आहेत. ‘उंबरठ्या बाहेरील स्त्रीयांचे जग’ आणि ‘तिमिरातील दीपज्योती’ असे ग्रंथांची नावे आहेत. राष्ट्रीय स्तरावरील जर्नलमध्ये त्यांचे 15 शोधनिबंध प्रकाशित आहेत.

एमफिलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सुनीता यांना नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने गाईडशिपही दिली होती. त्यांनी एमफिल करणाऱ्या 4 विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले आहे. मात्र कामाच्या व्यापामुळे त्यांनी गाईडशिप सोडून दिली. एमजीएमच्या नर्सिंग कॉलेजमध्ये शनिवार आणि रविवारी त्यांनी अध्यापन केले आहे. विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक अणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...