आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण, थेट स्पेनमधील सँटिआगाे विद्यापीठातून “भारतातील आदिवासी समाजाचे सत्तेतील स्थान’ या विषयावर पीएचडी आणि आता हिंगाेली जिल्ह्यातील अवघ्या १६०० लाेकसंख्या असलेल्या डिग्रसवाणी या दुर्गम खेड्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य. हा प्रेरक आणि तितकाच थक्क करणारा प्रवास आहे डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे यांचा. वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत पॅनलकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांच्या गटाचे नऊपैकी तब्बल ८ सदस्य निवडून आले. परदेशातील शिक्षणाचा उपयोग गावचा कायापालट करण्यासाठी करायचा आहे. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवायचा आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. चित्रा यांनी दिली. पीएचडी स्कॉलर ते ग्रामपंचायत सदस्य असा प्रवास त्यांच्याच शब्दांत....
नाशिक जिल्ह्यातील वणी हे माझे माहेर. आधीपासूनच राजकीय क्षेत्रात आवड असल्याने सन २०१० मध्ये पुणे विद्यापीठातून राजशास्त्र विषयात पदव्युत्त शिक्षण घेतले. त्यानंतर हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणीच्या प्रा. अनिल कुऱ्हे यांच्याशी माझा विवाह झाला. पती पीएचडी स्कॉलर असल्याने मलाही राजशास्त्रात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. कुटुंबीयांच्या संमतीने मी स्पेनमध्ये सँटिआगाे विद्यापीठातून शिकण्याचा निर्णय घेतला. भारत व स्पेनमध्ये राजकीय साम्य असल्याने दोघेही २०१२ मध्ये तेथे पोहोचलो. तेथे “भारतातील आदिवासी समाजाचे सत्तेतील स्थान : सन १९९२ ते २०१२’ या विषयावर पीएचडी केली. २०१६ मध्ये पीएचडी अन् युरोपियन युनियनची एक्स्पर्ट फेलोशिप मिळाली. डिग्रसवाणी येथे परतल्यानंतर पाण्यासाठी महिलांची भटकंती, रस्त्यांची दुर्दशा, सांडपाणी व्यवस्थापन, पुरुषांमध्ये व्यसनाधीनता, महिलांचे आरोग्याचे प्रश्न आदी प्रश्न भेडसावत असल्याचे पाहिले आणि ही बाब मनाला अस्वस्थ करणारी होती. त्यामुळे यापुढे भारतातच, किंबहुना गावातच राहून या प्रश्नावर काम करण्याचा निर्णय घेतला.
(शब्दांकन : मंगेश शेवाळकर)
आदर्श गाव बनवण्याचा बांधला चंग
पती प्रा. अनिल यांना प्रवरानगर येथील विखे पाटील महाविद्यालयात नोकरी मिळाली. मी मात्र डिग्रसवाणी गाव आदर्श करण्याचा चंग बांधला. पण यासाठी राजकारणात येण्याशिवाय पर्याय नव्हता. ग्रामपंचायत निवडणूक ही चालून आलेली संधी असल्याने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन गावात पॅनल उभे केले. गावचा अभ्यास करून जाहीरनामा तयार केला. विरोधी पॅनलवर टीका न करता केवळ विकासावर भर देणार असल्याचे आश्वासन दिले आणि यश मिळाले. सरपंचपद मिळाल्यानंतर आदर्श गाव करण्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. या निवडणुकीत वंचितचे प्रदेश पदाधिकारी राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष वसीम देशमुख, पदाधिकारी रवींद्र वाढे यांनी मदत केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.