आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:डाॅ. सानपांचा पत्ता कट, डॉ. पाडळकरांची वर्णी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नामनिर्देशित सदस्य होण्याची वाट पाहणाऱ्या डॉ. गजानन सानप यांचा दुसऱ्यांदा पत्ता कट झाला आहे. त्यांच्या ऐवजी मनपाच्या निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांची नियुक्ती केली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारींनी व्यवस्थापन परिषदेवर दोघांची नियुक्ती केली. त्यात पुण्यातील डॉ. काशीनाथ देवधर यांचेही नाव आहे.

विद्यापीठ विकास मंचचे महाराष्ट्राचे सचिव तथा (अभाविप) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत २५ वर्ष सक्रिय काम केलेल्या डॉ. गजानन सानप यांना २०१७ ते २०२२ दरम्यानच्या कार्यकाळातच सदस्य केले जाणार होते. पण त्यांच्या ऐवजी देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांची वर्णी लागली होती. शितोळे तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे डॉ. सानप यांना डावलून शितोळे यांना संधी दिली गेली. यावेळी डॉ. सानप यांच्या विद्यापीठ विकास मंच पॅनलने ३८ पैकी ५ अधिसभेच्या जागा पटकावल्या आहेत.

यापूर्वी एवढ्या जागा नव्हत्या आलेल्या. त्यांनी विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनलला चांगलीच झुंज दिली होती. त्यामुळे यावेळी डॉ. सानप यांची वर्णी लागेल, असे जवळपास सुनिश्चित होते. मात्र मनपाच्या निवृत्त वैद्यकिय अधिकारी डॉ. पाडळकर यांचे नामनिर्देशन झाल्याचे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. राज्यात भाजपचे सरकार आलेले असताना सलग दुसऱ्यांदा अभाविप कार्यकर्त्याचा पत्ता कट झाल्याची शैक्षणिक वर्तुळात चर्चा आहे. राजभवनचे प्रधान सचिव संतोष कुमार यांच्या स्वाक्षरीने जारी पत्रात काशीनाथ देवधर यांना शास्त्रज्ञामधून संधी दिली.

बातम्या आणखी आहेत...