आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. शिवाजी सुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय संचालनालयाच्या वतीने डॉ. सुक्रे यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. यासंदर्भात मंगळवारी “दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केले होते. यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
प्रभारी अधिष्ठाता डॉ. संजय मोरे यांनी वैयक्तिक कारणास्तव अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कारभार सांभाळण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शरीररचनाशास्त्र विभागाचे प्राध्यापक शिवाजी सुक्रे यांच्याकडे या विभागाचा पदभार सांभाळून परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा पदभार सोपवण्यात आला. तर संजय मोरे यांना त्यांच्या प्राध्यापक व विभागप्रमुख सूक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्यास सांगितले आहे.
दरम्यान, डॉ. सुक्रे यांनी १२ डिसेंबर २०१९ ते १ मे २०२३ पर्यंत नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावली. सुक्रे यांना ५०पेक्षा अधिक एमसीआयच्या निरीक्षणाचा अनुभव असल्यामुळे परभणीसाठी त्याचा फायदा होणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ३३ प्राध्यापकांची नियुक्ती परभणीच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी ३३ प्राध्यपकांच्या नियुक्ती करण्यात आल्या. यात नांदेड, लातूर, अंबाजोगाई, यवतमाळ, पुणे, लातूर, मिरज, अकोला या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून प्राध्यापकांच्या बदल्या करण्यात आल्या. १० मेपासून या सर्वांनी परभणी इथे रुजू होण्याचे आदेश वैद्यकीय संचालनालयाच्या वतीने काढण्यात आले. शासन पातळीवर सचिव, आयुक्त तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यातर्फे सातत्याने याबाबत पाठपुरावा सुरु असल्याचे वैद्यकीय संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले.
महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार
शासन तसेच वैद्यकीय संचालक, सचिवांनी माझ्यावर हे महाविद्यालय सुरू करण्याची जबाबदारी टाकली आहे. परभणीचे जिल्हाधिकारी तसेच इतर सर्व वैद्यकीय स्टाफ यांच्या मदतीने हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. सर्व त्रुटी दुरुस्त करून एनएमसीसमोर तपासणी यशस्वी करण्याचा माझा प्रयत्न असेल.- डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.