आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र विशेष:220 कोविड पॉझिटिव्ह मातांची प्रसूती करणाऱ्या डॉ. रूपाली

औरंगाबाद / रोशनी शिंपी7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा शिरकाव होताच मार्च २०२० मध्ये देशभरात लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि चक्रच थांबले. पण, सृजनाचे चक्र कुणी थांबवू शकत नव्हते. माणसं माणसांना हात लावण्यास धजावत नव्हती. कोरोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसूती कशी करायची याची मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर करण्यात आलेली नव्हती. कोविड-१९ पॉझिटिव्ह मातेचं बाळास दूध द्यायचं की नाही याची स्पष्टता नव्हती. अशा साऱ्या जोखमीच्या आणि गोंधळाच्या वातावरणात त्यांना मात्र थांबता येत नव्हते. स्वत:च्या जिवाची जोखीम पत्करून दोन हातांनी तब्बल २२० कोरोना पॉझिटिव्ह मातांची त्यांनी यशस्वी प्रसूती केली. ते हात होते औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या प्रसूती विभागातील डॉ. रूपाली गायकवाड यांचे.

घरात वयोवृद्ध सासू-सासरे आणि ५ वर्षांचा लहानगा मुलगा होता. अनेक वर्षांचा प्रसूतीचा अनुभव होता. पण या प्रसूतीची जोखीम स्वतःच्या जिवावर बेतू शकते याची पूर्णपणे जाणीव असतानादेखील डॉ. रूपाली यांनी हे आव्हान पार पाडले. सुरुवातीस चिंता वाटत होती. स्वत:सह स्टाफची मानसिक तयारी करण्यापासून सुरुवात करावी लागली व पुढे येणाऱ्या आव्हानांची रणनीती आखली.

२८ एप्रिलला पहिली बाधित माता घाटी रुग्णालयात आली तेव्हा पीपीई किट घालून प्रसूती करण्याचा पहिलाच अनुभव होता. एरवीच्या प्रसूतींप्रमाणे या वेळी कोविड संसर्गित महिलांसोबत तर नातलग राहू शकत नव्हते. त्यात कोविडमुळे त्या घाबरलेल्या. वाहतूक बंद असल्याने वैतागलेल्या. खासगी रुग्णालये बंद असल्याने भेदरलेल्या. अशा वेळी त्यांना धीर देण्यापासूनच कर्तव्य बजावावे लागले. दिवस भरल्याने अडलेल्या महिला लॉकडाऊन आणि कोविडच्या संकटाने अधिकच अडल्या होत्या. डॉ. गायकवाड यांच्या टीमने त्यांची सुटका करून नवीन जीवांना सुरक्षित जन्म दिलाच, याशिवाय मातेच्या दुधातून कोरोनाची लागण होत नाही हा अभ्यास जागतिक स्तरावर मांडणारे औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालय पहिलेच ठरले. त्यात डॉ. श्रीनिवास गडप्पा यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत टीममध्ये डॉ. रूपाली यांचा सिंहाचा वाटा आहे.

२२० मातांची प्रत्यक्ष प्रसूती झाली असली तरी ३ हजारांहून अधिक रुग्णांचे स्क्रीनिंग झाले. त्यातील ४४५ जणी कोविड पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यामध्ये १६२ जणींची सामान्य, तर ५८ जणींची सिझेरियन प्रसूती केली. यातील १४ बालके पॉझिटिव्ह आली होती. मात्र, नंतर तीदेखील बरी झाली.

बातम्या आणखी आहेत...