आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातारा परिसरातील आलोकनगरमध्ये देवळाईतून सोडण्यात आलेल्या ड्रेनेजच्या पाण्याचे तळे साचले आहे. ड्रेनेजचे पाणी दीड ते दोन एकरमध्ये पसरल्यामुळे सर्वत्र प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. डासांचे साम्राज्य वाढल्याने लहान मुले, वयोवृद्ध नागरिक आजारांच्या विळख्यात सापडले आहेत. सव्वाशे घरांच्या औरा व्हिलेजिया सोसायटीतील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सातारा परिसरातील आलोकनगरात देवळाई भागातील ड्रेनेजचे पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी घरासमोर साचते. औरा व्हिलेजिया या सोसायटीला या पाण्याचा विळखा पडला आहे. ड्रेनेजचे पाणी नाल्यात सोडण्यास देवळाईचे शेतकरी विरोध करत असल्याने आता हे पाणी दोन एकरच्या अधिकृत लेआऊटमध्ये पसरले आहे. या भागातील नागरिकांनी तसेच सातारा-देवळाई जनसेवा कृती समितीच्या वतीने अनेकदा मनपा प्रशासनाकडे निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. प्रशासनानेही ड्रेनेजचे पाणी उपसण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फारसा यशस्वी झाला नाही. या घाण पाण्यामुळे हातपंपांचे पाणी दूषित झाले आहे. ते पिण्यायोग्य राहिलेले नाही. रस्त्यावर घाण पाण्याचे तळे साचल्याने घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. डासही मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. त्यामुळे लहान मुले, वयोवृद्ध नागरिक आजारी पडत आहेत.
मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. ड्रेनेजच्या पाण्याची तातडीने विल्हेवाट लावण्यात यावी, नसता या भागातील नागरिक मनपासमोर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा सातारा-देवळाई जनसेवा कृती समितीने दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.