आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाहेर जाऊन येतो असे सांगून चारचाकी घेऊन घराबाहेर पडलेल्या, अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाचा दुचाकीचालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला. तर गुढीपाडव्यानिमित्त नाष्टा कॉर्नरचे उद्घाटन करून घराकडे जात असलेला दुचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात शनिवारी (२ एप्रिल) दुपारी साडेचारच्या सुमारास आरटीओ कार्यालयाजवळील वॉकिंग प्लाझासमोर घडला.
मानस अनिल धायतडक (२२, रा. बंगला नं. ६, नाथ व्हॅली जवळ, कांचनवाडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर रोहन हरिभाऊ भगत (१९, रा. बनेवाडी, रेल्वेस्टेशन परिसर) असे दुचाकीस्वाराचाचे नाव आहे.
मानस सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक अनिल धायतडक यांचा मुलगा आहे. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास तो चारचाकी (एमएच २० एफ वाय १६३०) घेऊन घराबाहेर पडला. रेल्वेस्टेशनकडून बाबा पेट्रोलपंपाकडे भरधाव वेगाने जात असताना वॉकिंग प्लाझासमोर एक दुचाकीस्वार (एमएच २० एफडब्ल्यू ४१५१) त्याच्या समोर आला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात मानसचे चारचाकीवरील नियंत्रण सुटले. त्याची चारचाकी दुचाकीस्वाराला धडकून डाव्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या खांबाला जाऊन धडकली. अपघातात मानसच्या डोक्याला आणि तोंडाला जोराचा मार लागला तसेच सिमेंटचा खांब आणि गाडीमध्ये तो दबला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार रोहन भगतने बन्सीलालनगर येथे स्वतःच्या नाष्टा कॉर्नरचे उद्घाटन केले होते. तेथून तो घराकडे जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्याला दिलेल्या धडकेत तो जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छावणी पोलिस ठाण्यात नोंद केली. तपास वरिष्ठ पोलिस हवालदार दिलीप जाधव करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.