आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुन्हे शाखेसह शहर पोलिस दलातील बहुतांश अधिकारी दंगलीच्या तपासात व्यग्र असताना दुसरीकडे साेनसाखळी चोर सक्रिय झाले आहेत. ४ एप्रिल रोजी अवघ्या तासाभरात तीन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरांनी हिसकावून नेले. यापैकी दोन घटना मयूर पार्कमध्ये व एन-९ मध्ये घडल्या तर तिसरी घटना वाळूज महानगरमध्ये घडली.
पहिल्या घटनेत मयूर पार्क भागातील कार्तिकनगरमध्ये राहणाऱ्या कामिनी निकम (४५) या मंगळवारी सायंकाळी सात वाजता मैत्रिणीसोबत निघाल्या. काही अंतरावर त्या वाटेत भेटलेल्या दुसऱ्या मैत्रिणीशी गप्पा मारण्यासाठी थांबल्या. तेव्हा त्यांच्याजवळ काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन तरुण आले. त्यांनी एकाचा पत्ता विचारला. दोघींनी नाव ओळखीचे नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी दुचाकी सुरू केली आणि तेवढ्यात मागे बसलेल्याने कामिनी यांच्या गळ्यातील ३ तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला.
दुसरी घटना वाळूज महानगरमध्ये सव्वाआठ वाजेच्या सुमारास घडली. प्रज्ञा क्षीरसागर (३५) मंगळवारी सायंकाळी कपड्याचे दुकान बंद करून मुलासह घरी निघाल्या होत्या. शिवाजी चौकाच्या पुढे जाताच त्यांच्या मागून दुचाकीस्वार आला. त्याने प्रज्ञा यांच्या गाडीसमोर दुचाकी उभी केली. त्यामुळे प्रज्ञा यांच्या गाडीचा वेग कमी झाला, दुचाकीवरील चोराने त्यांचे अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले.
तिसरी घटना एन-९ मधील संत ज्ञानेश्वरनगरमध्ये घडली. निशा पाठक (६१) मंगळवारी रात्री साडेआठ वाजता जेवण झाल्यानंतर परिसरात मैत्रिणींसह फिरत होत्या. नऊ वाजता सुसाट वेगात आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या जवळ जात दुचाकीचा वेग कमी केला आणि एक तोळ्याचे मंगळसूत्र झटका देऊन ओढून टीव्ही सेंटरच्या दिशेने पोबारा केला. तरुणांनी पाठलाग केला. मात्र, ते वेगात निघून गेले.
दोन घटनांमध्ये एकच चोर? मयूर पार्क ते एन-९ मध्ये दोन किलोमीटर अंतरात एका तासात दोन घटना घडल्या. या दोन्ही घटनांतील चोर एकच असून ते सायंकाळी सोसायट्यांमध्ये पायी फिरणाऱ्या महिलांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होते. महिलांनी सांगितलेल्या वर्णनावरून एकच दुचाकी असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.