आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापैशांच्या वादातून २५ वर्षीय तरुणाने मित्राच्या वडिलांची भररस्त्यात हत्या केली. कैलास वाकेकर (४७, रा. जयभीमनगर, टाऊन हॉल) असे मृताचे नाव असून अजय चव्हाण (रा. भावसिंगपुरा) असे मारेकऱ्याचे नाव आहे. दोन दिवसांपासून त्यांच्यात पैशावरून वाद सुरू होता. अजयला शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कैलास वाकेकर दिसले. त्याने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढला व त्याने काही क्षणांत जवळच्या मांस विक्रेत्याच्या हातातून चाकू हिसकावून आणत वार केले.
स्थानिक व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास हे सामाजिक कार्यकर्ते होते. अनेक सामाजिक, राजकीय नेत्यांसोबत त्यांची मैत्री होती. मृत कैलास व आरोपी अजयची ओळख होतीच. त्याशिवाय त्यांचा मुलगा जयेश व अजय हे मित्र आहेत. दोन दिवसांपूर्वी टाऊनहॉल परिसरात त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. शुक्रवारी सायंकाळी अजय हा माजी नगरसेवक संजय जगताप यांच्या पँथर भवन या कार्यालयाजवळ असताना त्याला कैलास दिसले. त्यांना अडवून त्याने वाद घातला. आरोपी अजय वडिलांसोबत वाद घालत असल्याचे कळताच जयेश व त्याची बहीणदेखील धावत आली. मात्र, तोपर्यंत वाद वाढला होता. अजयने जवळच्या चिकन शॉपमध्ये जात विक्रेत्याकडून चाकू हिसकावून घेत कैलास यांच्या पाठीत भोसकला.
स्थानिकांनी घेतली धाव, मारेकरी पोलिसांच्या ताब्यात
कैलास यांना स्थानिकांनी तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत जास्त रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. तेथील नागरिकांनी आरोपीला ताब्यात घेत ठाण्यात नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे, निरीक्षक अशोक तावरे, उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर कैलास यांची आई, पत्नीने धाव घेतली. त्यांचे अनेक मित्र जमा झाले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.