आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उडता औरंगाबाद !:मुंबईमध्ये बाजार उठला, ड्रग्ज माफिया शहरात सक्रिय, पाेलिसांनी दाेघांच्या मुसक्या अावळल्या : माजी नगरसेवकाची कार जप्त

औरंगाबाद (मंदार जोशी)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही गुटखा किंगना नशेखोरीच्या धंद्याची झिंग

बाॅलीवूडमधील ड्रग्जच्या संसर्गाचे लाेण अाैरंगाबादपर्यंत पसरलेले असल्याचे उघडकीस अाले अाहे. वेदांतनगर पाेलिसांनी मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास ड्रग्ज व चरसची तस्करी करणाऱ्या दाेघांना अटक केली. नुरोद्दीन बद्रोद्दीन सय्यद व अाशिक अली मुसा कुरेशी अशी त्यांची नावे अाहेत. मुंबईहून अालेल्या या दाेघांजवळून एमडी ड्रग्जच्या १३ पुड्या आणि २५ चरसच्या पुड्या जप्त केल्या. त्याची किंमत काळ्याबाजारात सुमारे ८० हजार रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

अमली पदार्थांचा साठा घेऊन हे दाेघे पंचवटी चौकात येणार असल्याची खबर पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांच्या कारमधून (एमएच २० एअार २) अमली पदार्थ जप्त करण्यात अाले. या काळ्या रंगाच्या स्काॅर्पिअाे कारवर ‘महापालिका सदस्य’ असा लोगो आहे. त्यामुळे ड्रग्ज तस्करीशी माजी नगरसेवकाचा संबंध आहे की नाही याचा तपास पोलिस करत आहेत. पहाटे या दाेघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील नार्को टेस्ट विभागाशी संपर्क साधला. नार्कोच्या अधिकाऱ्यांनी अहवाल दिल्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. वेदांतनगर पोलिस ठाण्यात या दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल रोडे, उपनिरीक्षक सतीश भोसले, आर. टी. भदरगे, सहायक फौजदार सय्यद हनिफ, कलंदर पठाण, मंगेश अभंग, शेख अस्लम, मोहन पाटील, सचिन संपाळ यांनी केली.

शहरात नशेखोरांचे अड्डे : शहरात अमली पदार्थांची तस्करी व विक्री हाेेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाळूज, पंढरपूर, नारेगाव, उस्मानपुरा, बीड बायपास, भडकल गेट, शहागंज या ठिकाणी नशेखोरांचे अड्डे आहेत. यापूर्वी नशेतून खुनाच्या घटनाही घडल्या आहेत. दीड वर्षापूर्वी जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेजवळ एका परदेशी तस्कराला अफूसह पकडण्यात आले होते.

घरफोड्या ड्रग्जसाठी मुंबईला
सातारा परिसरातील कुख्यात घरफोड्या चोरीतून मिळालेले पैसे घेऊन मुंबईला खास करून ड्रग्ज घेण्यासाठी जायचा. २०१७ साली पैठण रोडवर झालेल्या दरोड्यात त्याचा समावेश होता. त्यानंतर त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती.

ट्रक, बसच्या क्लीनरमार्फत होतो व्यापार

मुंबईच्या ड्रग्ज माफियांचा आता औरंगाबादेत वावर असल्याचे मंगळवारी निदर्शनास आले. मात्र, येथे अनेक वर्षांपासून १५०० रुपये तोळा असा दर असलेले काश्मिरी चरस दिल्ली, मुंबई, पंजाबातून ट्रक, बस क्लीनरमार्फत येते.

काही गुटखा किंगना नशेखोरीच्या धंद्याची झिंग

पंजाब, दिल्ली, मुंबईतील अनेकांचे आयुष्य ड्रग्ज माफियांनी उद्ध्वस्त केले. अाता अभिनेता सुशांतसिंहच्या अात्महत्येप्रकरणानंतर नॅशनल ड्रग्ज ब्युरोने मुंबईत या तस्करांविराेधात जाेरदार माेहीम सुरू केली. त्यामुळे मुंबईतील माफियांचा बाजार उठला. तेथे ‘माल’ विकणे अवघड झाले. त्यामुळे त्यांनी औरंगाबादसारख्या छाेट्या शहरांकडे मोर्चा वळवल्याचे मंगळवारी झालेल्या कारवाईवरून दिसून येते. गुटख्याच्या व्यापारातील काही जण ड्रग्ज सप्लायमध्ये उतरले आहेत, अशीही सूत्रांची माहिती आहे. ‘एमडी’ ड्रग्जला अनेक टोपणनावे आहेत. काेणी मुंबई ड्रग्ज तर कोणी म्याऊ म्याऊ म्हणतात. कोकेनपेक्षा स्वस्त व नशेचा अंमल वेगात होत असल्याने अनेक तरुण या ड्रग्जच्या आहारी जातात.

संपत्ती विकून लाखो रुपये आल्यावर नशेबाजी
अाराेपी आशिक अली मुसा कुरेशी (४१, रा. कुर्ला, मंुंबई) शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करतो. औरंगाबादेतील जिन्सीतील एका माजी नगरसेवकाचा तो मेहुणा आहे. कारवाईत जप्त केलेली कार (एमएच २० एआर २) त्याच माजी नगरसेवकाची आहे. मात्र त्याने ती तीन महिन्यांपूर्वी बासित नावाच्या व्यक्तीला विकल्याचेे सांगितले जाते. आशिकच्या वडिलांनी मुंबईतील मालमत्ता विकल्यावर त्याच्या वाट्याला लाखो रुपये आले. त्यातून त्याने नशा करायला सुरुवात केल्याची माहिती अाहे.

सोशल मीडियाचा गैरवापर
पाेलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या माफियांचे एजंट सोशल मीडियावर सक्रिय असतात. कोणता तरुण वाॅलवर पार्टी करतानाचे फोटो टाकतो, याचा ते शोध घेतात. असा तरुण सापडला की त्याच्याशी सोशल मीडियावर मैत्री करतात. मग मोबाइल नंबर मिळवून संपर्क साधतात. दारूपेक्षा ‘एमडी’ची चव एकदा चाखून पाहा, असे त्याला सांगितले जाते आणि काही तासांतच ड्रग्ज त्या तरुणाकडे पोहोचवले जाते. सध्या औरंगाबादेत एमडीची एक ग्रॅमची पुडी पाच हजार रुपयांना विकली जाते. एमडी ड्रग्जचा अंश पिकांसाठी खत म्हणून वापरला जातो. मात्र, तो कोकेनसारखीच नशा देतो, असे लक्षात आल्यावर माफियांनी त्यात काही रसायने टाकून त्याची पावडर तयार केली. मुंबई, दिल्ली, पंजाबमध्ये छोट्या खोलीत हे तयार होते, असे पोलिस तपासात समोर आले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser