आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हवामान बदल, वाढते औद्योगिकीकरण व हरित वायूचे उत्सर्जन यामुळे मागील ३० वर्षांत राज्यातील नैऋत्य मोसमी पावसाचा ट्रेंड चांगलाच बदलला आहे. राज्यातील अहमदनगर, सोलापूर, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांत पावसाळ्यातील कोरडे दिवस कमी झाले आहेत, तर जळगाव, नंदुरबार, भंडारा, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यांत ड्राय डेची संख्या वाढली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अहवालातून ही बाब समोर आली आहे. आयएमडीच्या मते, पावसाळ्याच्या काळात २४ तासांत २.५ मिमीपेक्षा कमी पाऊस झाल्यास त्यास कोरडा दिवस-ड्राय डे असे म्हणतात. आयएमडीच्या पुणे येथील क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेस विभागाने राज्यातील पावसाचे वैविध्य आणि बदल यासंबंधी १९८९ ते २०१८ या काळातील पावसाच्या नोंदीवरून हा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, जून ते सप्टेंबर या नैऋत्य मोसमी पावसाच्या काळात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस पडतो, तर सांगली जिल्ह्यात पावसाळ्यात सर्वात कमी (४५४.२ मिमी ) पाऊस पडतो. पालघर जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमान वाढलेले आढळले, तर औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यांत वर्षाकाठी पडणाऱ्या पावसाचे प्रमाण घटल्याचे दिसून आले.
सर्वाधिक कोरडे दिवस मराठवाड्याच्या वाट्याला
१९८९ ते २०१८ या ३० वर्षांच्या काळात पावसाळ्यातील कोरड्या दिवसांचे कमाल प्रमाण ७१ ते ७९ दिवस आहे. अकोला, बुलडाणा, वाशीम, सातारा, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, जालना, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, जळगाव, धुळे आणि अहमदनगर या जिल्ह्यांत ऐन पावसाळ्यात सरासरी ७१ ते ७९ दिवस कोरडे जातात, तर सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, मुंबई उपनगरे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ३७ ते ४६ दिवस ड्राय असतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.