आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्र शासनाच्या निर्णयानुसार राज्यात शनिवारपासून पुणे, नागपूर, नंदुरबार, जालना या चार जिल्ह्यांत ड्राय रन घेतला जाणार असून प्रत्यक्षात लसीकरणासाठी १६,००० जणांना व्हॅक्सिनेटर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली.
येथील राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी बातचित केली. ते म्हणाले की, कोविड लसीकरणाबाबत शनिवारपासून ता. १ राज्यात चार जिल्ह्यांत ड्राय रन घेतला जाणार आहे. त्यासाठी २५ जणांसोबत प्रत्यक्षात लसीकरणाचा ट्रायल घेतला जाणार आहे. यामध्ये त्यांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून त्यांना लसीकरण केंद्रावर बोलावले जाईल, त्यानंतर त्यांची ओळख पटविली जाणार असून तिसऱ्या टप्प्यात लसीकरण करून चौथ्या टप्प्यात त्यांना अर्धा तास पर्यवेक्षणाखाली ठेवले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात प्रत्यक्षात कोविड लसीकरणाचा सर्व तयारी पूर्ण झाली असून लसीकरणासाठी १६,००० जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून लसीकरणाचे काम केले जाणार आहे. या शिवाय कोविड लसीकरणासाठी कोल्ड चेन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ज्या बाबींची कमतरता आहे त्याबाबत केंद्र शासनाला कळविण्यात आले असून केंद्र शासनाकडून त्याची पूर्तता करण्यासाठी योग्य काळजी घेईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
लसीकरणाच्या वेळी त्रुटी राहू नये यासाठी ड्राय रन
राज्यात प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी कुठल्याही प्रकारची त्रुटी व कमतरता राहू नये, या उद्देशाने ड्राय रन हाती घेण्यात आला. लसीकरणासाठी वापरली जाणारी पद्धतच या वेळी वापरली जाणार आहे. त्यामुळे नेमक्या काय त्रुटी राहू शकतील, याचा अंदाज येणार आहे. त्या त्रुटी व कमतरता सुधारल्या जाणार आहे. केंद्र शासनाने सीरम इन्स्टिट्यूट किंवा भारत बायोटेक यांना लसीकरणाबाबत परवानगी दिल्यानंतरच प्रत्यक्ष कोविड लसीकरणाला सुरुवात होईल.
‘संभाजीनगर’बद्दल कोअर समिती निर्णय घेईल
औरंगाबाद शहराचे ‘संभाजीनगर’ नामांतर करण्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारची तिन्ही पक्षांची कोअर समिती स्थापन झाली आहे. या समितीमध्ये तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते आहेत. कोणत्याही वादाच्या विषयावर या समितीमध्ये निर्णय होतो. औरंगाबाद शहराचे नामांतर हा सर्वसाधारण चर्चेचा विषय नाही. त्याबाबत कोअर समितीच निर्णय घेईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.
नांदेडमध्ये गुरुद्वारा येथे घेतले दर्शन
नांदेड | आरोग्यमंत्री टोपे यांनी नांदेड येथे ऐतिहासिक गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर साहिब अबचलनगर साहिब येथे गुरुवारी (३१ डिसेंबर) रात्री ७.३० वाजता दर्शन घेतले. राज्यातील कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी गुरुद्वारात अरदास केली. त्यानंतर ते पुढे हिंगोलीकडे रवाना झाले. या वेळी गुरुद्वाराचे बाबाजी यांनी पारंपरिक पद्धतीने मंत्री टोपे यांचा सत्कार केला. या वेळी आ. मोहनअण्णा हंबर्डे, आ. श्यामसुंदर शिंदे उपस्थित होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.