आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सतीश वैराळकर भारतीय सैन्यातून दरवर्षी ६० हजार जवान निवृत्त हाेतात. निवृत्तीपूर्वी महिनाभर आधीच त्यांना मुख्यालयी जाऊन हजर व्हावे लागते. मात्र आता काेराेनाचा प्रादुर्भाव असल्याने या नियमात बदल करण्यात आले आहेत. आता कर्तव्य बजावत असलेल्या ठिकाणीच जवानास निवृत्त केले जाईल. सेवेचा कालावधी संपून निवृत्त झाले असले तरी लाॅकडाऊन संपेपर्यंत या जवानाला ड्यूटीच्या ठिकाणी थांबून कर्तव्य बजावण्याचे आदेश लष्करातून देण्यात आले आहेत. त्यामुळे असे अनेक जवान देशभरात फिल्डवर तैनात आहेत.
सैन्यातील जवानास निवृत्तीपूर्वी एक वर्ष आधी म्हणजे सेवेत असतानाच नागरी सेवेतील प्रशासनात नाेकरीची तरतूद केली जावी यासाठी सैनिक कल्याण विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे. सेवेतून निवृत्त हाेताना जवानांना एक महिन्यापूर्वीच कर्तव्य बजावत असलेल्या ठिकाणाहून मुख्यालयी पाठविले जाते. मुख्यालयी संबंधित जवानांची निवृत्तीची कागदपत्रे, वैद्यकीय सेवा सुविधांची तरतूद, भविष्य निर्वाह निधी व इतर कागदपत्रे तयार केली जातात. त्यासाठी एक महिनाभर त्यास मुख्यालयी राहावे लागते. मात्र आता लाॅकडाऊनमुळे संरक्षण विभागाने एक पत्र जारी करून निवृत्ती घेणाऱ्या सैनिकास मुख्यालयी जाण्याची सक्ती रद्द करण्यात आली.
देशाच्या अनेक भागात संचारबंदीमुळे पाेलिसांबराेबरच लष्करी जवानही तैनात आहेत. या संकटकाळात फाैजफाटा कमी पडू नये म्हणून निवृत्तीनंतरही हे लष्करी जवान देशाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.