आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगाळ वातावरण:सततच्या पावसामुळे ‘ऑक्टोबर हीट’ जाणवलीच नाही ; पावसाळ्यानंतर थेट थंडीला सुरुवात

औरंगाबाद / संतोष देशमुखएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या हवामानामुळे ऑक्टोबरमध्ये ढगाळ वातावरण व धो धो पाऊस पडला. परिणामी ढगांच्या आच्छादनात सूर्यकिरणे जास्त दिवस अडवली जाऊन कमाल तापमानात एक ते पाच अंशांपर्यंत घट झाली. ऑक्टाेबर हीट म्हणजेच छोटा उन्हाळा जाणवला नाही. त्यामुळे पावसाळा ऋतूनंतर थेट हिवाळ्याला सुरुवात झाली आहे.

मेअखेर ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्री-मान्सून, ७ जून ते सप्टेंबरअखेरपर्यंत मान्सून व त्यानंतर परतीच्या मान्सूनचा काळ असतो. मात्र, हवामान बदलामुळे प्री-मान्सूनऐवजी थेट मान्सूनच उशिराने दाखल होत आहे. जून व जुलै हमखास पाऊस पडण्याचे महिने होते. ते आता पुढे सरकत चालले असून ऑक्टोबरपर्यंत मान्सून लांबणीवर पडत आहे. त्यामुळे ऑक्टोबर हीट कमी झाली आहे. यंदा त्यात ५ अंशांपर्यंत मोठी घसरण झाल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे.

मान्सूनमधील पावसाने खरीप पिकांची वाढ चांगली होते. तर ऑक्टोबर हीटमुळे गुणवत्ता, दर्जा, पीक काढणीस येण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. मात्र, सूर्यकिरणे ढगांच्या आच्छादनात अडवली जाऊन प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त काळ मंदावलेली राहिली. आर्द्रतेत वाढ होती. दमट वातावरण कीड, रोग, बुरशीजन्य रोग वाढवण्यासाठी उपयुक्त ठरले. त्याचा फळपिकांवर विपरीत परिणाम झाला. बाजारात खराब शेतमाल विक्रीस येत आहे. उत्पादनात घट आली आहे. थंड, दमट वातावरणामुळे ताप, विविध आजारही बळावले होते.

२०१९ ते २०२२ दरम्यान जास्त पाऊस २०१५ मध्ये ऑक्टोबरचे तापमान ३२ ते ३५ अंश दरम्यान होते. जे सरासरीपेक्षा पाच अंशांपर्यंत जास्त नोंदवले गेले. २०१८ मध्ये अशीच स्थिती होती व पर्जन्यमान केवळ २.८ मिमी झाले होते. त्या तुलनेत २०१९ ते २०२२ दरम्यान ऑक्टोबरमध्ये विक्रमी पाऊस पडला. तसेच तापमानही कमी नोंदवले गेले.

चार वर्षांतील तापमान असे राहिले : चिकलठाणा वेधशाळेने घेतलेल्या तापमानाच्या नोंदणीचा अभ्यास केला असता ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरुवातीचे तीन दिवस ३२.३ अंशांपर्यंत तापमान राहिले. त्यानंतर तापमानात सतत चढउतार झाले. मात्र, पारा ३२ अंशांवर गेला नाही. २०२१ च्या ऑक्टोबरमध्ये तेरा दिवस पारा ३२ अंशांवर तर चौदा दिवस ३१ ते ३१.८ अंश सेल्सियसवर होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबर हीट कमी राहिल्याचे स्पष्ट झाले. २०२० च्या ऑक्टोबरमध्ये सात दिवस पारा ३३.३ अंशांवर तर दहा दिवस ३२ अंशांवर होता. २०१९ ऑक्टोबरला १९ दिवस ३० ते ३१ अंशांदरम्यान तापमान राहिले. नऊ दिवस तापमानात सहा अंशांपर्यंत मोठी घसरणीचीही नोंद झाली.

आता पुढे काय ? हिवाळा ऋतू सुरू झाला आहे. २० ऑक्टोबरला २१.१ अंशांवर असलेले किमान तापमान ११ अंशांनी घसरून ते १ नोव्हेंबरला यंदाच्या मोसमात सर्वात कमी १२.५ अंश सेल्सियस नोंदवले गेले. सरासरीच्या तुलनेत ४ अंशांनी मोठी घसरण झाल्याची नोंद झाली. दिवसाच्या तापमानातही २ अंशांनी घट झाली. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. थंड, उष्ण, बाष्पयुक्त वाऱ्यांचा आकाशात संगम होऊन अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात चढउतार होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...