आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानपुरा परिसरातील डी-मार्टलगतच्या साेमवारच्या पीरबाजारच्या आठवडी बाजारात साचलेला कचरा देशपांडेपुरम च्या भिंतीलगत टाकला जाताे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. तसेच पेटवून दिलेल्या कचऱ्यामुळे होणारा धूरही देशपांडेपुरमच्या नागरिकांना त्रासदायक ठरताे. याबाबत मनपा प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही समस्या सुटत नाहीत. आठवडी बाजाराचा कंत्राटदारही रहिवाशांना जुमानत नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. दैनिक दिव्य मराठीने येथील ट्रॅव्हल्स पार्किंगच्या गाड्यांमुळे रहिवाशांना होणाऱ्या त्रासाबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर काही प्रमाणात ट्रॅव्हल्सचा त्रास कमी झाला. परंतु, आठवडी बाजारातील स्वच्छतेबाबत कंत्राटदार उदासीन दिसत असल्याने रहिवासी त्रस्त आहेत. मनपा प्रशासनाने कंत्राटदाराविराेधात कारवाई करावी तसेच कचरा वेळेवर उचलून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी हाेत आहे.
डी-मार्ट शेजारी सोमवारी आठवडी बाजार भरतो. त्या वेळी श्रीहरी पॅव्हेलियन लगत असलेल्या देशपांडेपुरम वसाहतीच्या भिंतीलगत सर्व कचरा टाकला जाताे. तसेच, अनेक जण भिंतीशेजारी लंघुशंकाही करतात. ज्या कंत्राटदाराला बाजाराचा ठेका दिला आहे, त्याने कचरा संकलन करून स्वच्छता करणे अपेक्षित आहे. परंतु, ताे जुमानत नसल्याने रहिवासी त्रस्त आहेत. दुसरीकडे त्याच परिसरात ट्रॅव्हल्सची पार्किंग आहे. मात्र तेथील परिसर कंत्राटदार स्वच्छता करतो. त्यामुळे आठवडी बाजाराच्या कंत्राटदारासही स्वच्छता करण्याचे आदेश द्यावे किंवा त्यांचा ठेका रद्द करावा, अशी मागणी हाेत आहे.
नागरिक भिंतीवर लघुशंका करतात बाजाराच्या दिवशी साेमवारी मोठ्या प्रमाणात भिंतीशेजारी कचरा टाकतात. आमच्या घराच्या खिडक्या बाजाराच्या दिशेनेच आहेत. त्यामुळे काही नागरिक लघुशंका करतात. त्याचा आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागताे. आम्हाला खिडक्या उघडणेदेखील कठीण झाले आहे. -राधिका गोले
कंत्राटदाराची जबाबदारी असते आम्ही ठरवून दिलेल्या पार्किंगच्या जागेवर स्वच्छता करतो. पूर्वी गाड्यांचा त्रास होता. तोही आम्ही सोडवला आहे. आता गाड्या लांब उभ्या करतो. आठवडी बाजाराचा कंत्राटदार दुसरा आहे. त्याने कर्मचारी नेमून परिसराची स्वच्छता करावी. -राहुल गोरे, पार्किंग चालक
आम्ही पैसे देण्यास तयार या परिसराची स्वच्छता करावी, यासाठी आम्ही वारंवार मनपा कर्मचाऱ्यांना सांगतो. पण, ते बाजाराच्या कंत्राटदाराकडे बोट दाखवून परिसर स्वच्छ करत नाहीत. कंत्राटदारही मनमानी करत आहेत. त्यामुळे मनपाने आमच्याकडून पैसे घेऊन स्वच्छता करावी. आम्ही तयार आहाेत. -रूपाली करपे, रहिवासी देशपांडेपुरम
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.