आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपाकडील कोरोना प्रतिबंधक लसींचे तब्बल १४ हजार डाेस ३१ डिसेंबर रोजी कालबाह्य ठरले. त्यामुळे २ जानेवारी रोजी लसीकरणात खंड पडला. गेल्या दोन वर्षात १८ लाख ७६ हजार १६८ जणांचे लसीकरण करण्यात आले. आता ७५ हजार लसींची मागणी करण्यात आली आहे. यात कोविशील्ड, कोव्हॅक्सिन, कोर्बोव्हॅक्स या लसींचा समावेश आहे.
शहरात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती. दोन वर्षे मनपाच्या सर्व आरोग्य केंद्रांत ही सुविधा सुरू होती. राज्य सरकारकडून वेळोवेळी मनपाला १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन तर लहान मुलांसाठी काेर्बाेव्हॅक्स या लसींचा साठा पुरवण्यात आला. १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट १० लाख ५५ हजार ६५४ एवढे ठेवण्यात आले होते. त्यापैकी ९ लाख १३ हजार ८२३ जणांनी पहिला डोस घेतला तर ७ लाख २१ हजार ६१४ जणांनी दुसरा डोस घेतला. बूस्टर डोस घेण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. १ लाख ३ हजार ४१६ जणांनीच तिसरा डोस घेतला. अद्याप १ लाख ४१ हजार ८३१ जणांनी पहिला तर ३ लाख ३४ हजार ४० जणांनी दुसरा डाेस घेतला नाही.
कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती आहे. त्यामुळे मनपाने शासनाकडे कोविशिल्डचे ५० हजार, कोव्हॅक्सिनचे १५ हजार आणि काेर्बोव्हॅक्सचे १० हजार डोस पहिल्या टप्प्यात मागवले आहेत. त्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू असल्याचे मनपाच्या आराेग्य विभागाने सांगितले.
मुदत संपल्याने ३५ लाखांच्या लसी वाया मुदत संपल्यामुळे कोरोनाच्या १४ हजार लसींचा साठा कालबाह्य झाला. म्हणजेच ३५ लाख रुपयांच्या लसी वाया गेल्या आहेत. पहिल्या व दुसऱ्या लाटेत खासगीत कोविशील्डची एक लस ७०० तर काेव्हॅक्सिनची १५०० रुपयांना दिली होती. शासनाने ती २४४ रुपयांत कंपनीकडून खरेदी केली हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.