आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात कुशल मनुष्यबळाचा अभाव:परराज्यातील मनुष्यबळावर आपण विसंबून आहोत, छत्रपती संभाजीराजे यांचे प्रतिपादन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे परराज्यातील मनुष्यबळावर विसंबून राहावे लागत आहे. बेरोजगारीचा प्रश्न आपल्याकडे गंभीर बनला आहे. यावर मात करण्यासाठी कौशल्यावर आधारित मनुष्यबळ निर्मिती करणे नितांत गरजेचे झाले आहे, असे प्रतिपादन छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी केले.

मोरया असोसिएट्स २० वा वर्धापनदिन व मोरया गणेश फाउंडेशन समारंभाचे उद्घाटन शनिवारी छत्रपती युवराज संभाजी राजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार हरिभाऊ बागडे, प्रसिद्ध वक्ते प्रदीप सोळुंके, राजू शिंदे, संस्थापक अध्यक्ष गणेश मानकुसकर आदींचे उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आणि महिला टीमचा सत्कार करण्यात आला.

कौशल्यावर भर द्यावा

सामाजिक दायित्व पूर्ण करण्यासाठी ज्यांची पोट भरलेली आहे, त्यांनी रिकामं पोट असलेल्यांचा विचार केला पाहिजे. सामाजिक दरी भरून काढण्यासाठी प्रत्येकाने पाऊल उचलण्याची गरज आहे. त्याचे आत्मभान ठेवून सर्वांनी काम करण्याचे आवाहन प्रास्ताविकात प्रसिद्ध प्रवक्ते प्रदीप सोळुंके यांनी केले. तर, आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले की, ज्यांच्याकडे कौशल्य त्यांनाच नोकरी मिळेल. अन्यथा उच्च शिक्षण घेऊनही काहीच उपयोग होणार नाही. जुने शिक्षण पद्धती फारसी उपयोगाची नाही. त्यामुळे कौशल्यावर आधारित, बौद्धिक क्षमता वाढवणारी शिक्षण पद्धतीचा अवलंब होणे गरजेचे आहे. तरच कुशल मनुष्यबळ तयार होतील व मुलांच्या हाताला कामही मिळेल. यातूनच सर्वांगीण प्रगती साध्य होईल. हर्षवर्धन कराड म्हणाले की, शिक्षण प्रशिक्षण आणि सशक्तिकरण ही काळाची गरज आहे. यातच आपण मागे राहिले आहोत. त्यामुळे विकास खुंटला आहे. यातून पुढे जायच असेल तर प्रत्येकाने स्किल डेव्हलपमेंटसाठी परिश्रम घेण्याची गरज आहे. शिक्षण घेतल्यानंतर मुलाखत, कोणत्या क्षेत्रात आपण काम करणे गरजेचे आहे. त्यासाठीचे मार्गदर्शन मिळाले तर त्याचा विनियोग चांगला होईल.

भाषण करुन चालणार नाही

छत्रपती युवराज शंभूराजे पुढे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेतला. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हा वसा चालू ठेवला. कौशल्य आधारित मनुष्यबळ तयार करणे हा त्यांचाच गुणमंत्र आहे .त्यामुळे लोकनेत्यांनी भाषण करून काही होणार नाही. चांगलं मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आम्हाला आत्माचिंतन करून अंमलबजावणी करण्याची गरज आहे. साऊथ कोरिया येथील हुसांग कंपनी ग्रुप महाराष्ट्र विशेषत: औरंगाबाद मध्ये कंपनी स्थापन करू इच्छित होती. मात्र त्यांना पोषक वातावरण मिळत नव्हते. अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यावेळी मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी बोललो होतो. त्यानुसार दोन हजार कोटीचा हा प्रोजेक्ट संभाजीनगरला आणण्याचे निश्चित झाले होते मात्र पुढे त्या कंपनीने मला काही कळवले नाही तर त्याचे काय झाले हेही मला माहिती नाही. ही मोठी शोकांतिका असल्याचा खेद त्यांनी व्यक्त केला.

कुशल मनुष्यबळ गरजेचे

शंभूराजे म्हणाले, नाशिक इगतपुरी येथे देखील विविध उद्योग सुरू आहेत. मात्र भूमिपुत्रांना दहा ते पंधरा टक्केच नोकरी मिळते. अशी स्थिती इतर उद्योग नगरीत आहे. याचं कारण आहे की आपल्याकडे कुशल मनुष्यबळ नाही. त्यामुळे परराज्यातून आपल्याकडे मनुष्यबळ येते. त्याला आपणच कारणीभूत आहे. याचा सारासार विचार करून आपल्याला त्या क्षमतेचं कुशल मनुष्यबळ तयार करणे अत्यंत गरजेचे आहे. तरच आपल्या येथील बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागेल सर्वांच्या हाताला काम मिळेल.

बातम्या आणखी आहेत...