आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीची परीक्षा:हाॅलतिकिटावर टाइमटेबलमध्ये क्रम चुकल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला उशीर

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी परीक्षेच्या हाॅलतिकिटावरील वेळापत्रकात तारखांचा क्रम चुकल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना बुधवारी (आठ मार्च) हिंदीच्या पेपरला मनस्ताप सहन करावा लागला. तारखांचा क्रम चुकल्याने संभ्रमात असलेले विद्यार्थी परीक्षेला सुमारे २० ते २५ मिनिटे उशिरा पोहोचल्याचा प्रकार शहरातील दहा ते बारा केंद्रांवर घडला. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना केंद्रप्रमुखांच्या अधिकारात प्रवेश देण्यात आला.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या परीक्षा २ मार्चपासून सुरू झाल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांचा बुधवारी (आठ मार्च) हिंदी भाषा विषयाचा पेपर होता. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉलतिकिटावर २ मार्च रोजी पहिला पेपर मराठीचा असल्याचे छापण्यात आले आहे. त्याखाली लगेचच दुसरा पेपर ८ मार्च रोजी हिंदीचा आणि त्यानंतर ६ मार्च रोजी तिसरा पेपर इंग्रजीचा असल्याचे छापले आहे. ६ मार्च आणि ८ मार्च या दोन तारखांचा क्रम चुकला आहे. त्याचबरोबर मंगळवारी धूलिवंदनाची सुटी असल्याने आणि तारखांच्या क्रमातील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यामुळे बुधवारी अनेक विद्यार्थ्यांना हिंदीचा पेपर असल्याचे उशिरा माहीत झाले.

परिणामी, शहरातील दहा ते बारा परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी २० ते २५ मिनिटे उशिरा पोहोचले. हॉलतिकिटावरील तारखांमुळे संभ्रम निर्माण झाल्याने उशीर झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले. त्यानंतर त्यांना पेपर सोडवण्याची परवानगी देण्यात आली. यामुळे पेपर लिहिण्यासाठी असलेल्या वेळेत पेपर सोडवण्याची कसरत विद्यार्थ्यांना करावी लागली.

यापूर्वी बारावीच्या इंग्रजी पेपरदरम्यान शिक्षकांसाठीचे ‘मॉडेल आन्सर’ प्रश्नाऐवजी छापून आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर आता दहावीच्या हाॅलतिकिटावरील तारखांचा क्रम चुकल्याचा प्रकार समोर आला आहे.

तक्रार आली नाही तारखा बरोबर आहेत, फक्त क्रम चुकला आहे. ही छपाईतील चूक असू शकते. तशा तक्रारी नाहीत. काही मुलांच्या हॉलतिकिटामध्ये अशी चूक होऊ शकते. यात विद्यार्थ्यांची चूक नाही. - अनिल साबळे, प्रभारी अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ

विद्यार्थीहित जपले एखाद्या कारणासाठी काही मिनिटे विद्यार्थ्यांना उशीर झाला, तर केंद्रप्रमुख त्यांच्या अधिकारात त्यांना प्रवेश देऊ शकतात. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच हा अधिकार त्यांना देण्यात आला आहे. - एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

बातम्या आणखी आहेत...