आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅकेट उद्ध्वस्त:सशस्त्र पोलिस दलाच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार; 9 लाख रुपयांत ठरला व्यवहार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय सशस्त्र पाेलिस दल, आसाम रायफल व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची पहिली परीक्षा बुधवारी पार पडली. चिकलठाणा एमआयडीसीतील केंद्रात एका उमेदवाराच्या जागी तरुण परीक्षा देण्याच्या तयारीत असताना पकडला गेला. त्याच्या कानात ट्रान्समिटर व ब्ल्यूटूथ आढळले. बाहेर बसलेली टोळी त्याला उत्तर पुरवणार होती. मूळ उमेदवाराने नऊ लाख रुपयांत हा व्यवहार ठरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अविनाश सजन गोमलाडू (२१, रा. शिवगाव, ता. वैजापूर) आणि विकास शाहुबा शेळके (२३, रा. टाकळी, ता. कन्नड) अशी आराेपींची नावे आहेत.

चिकलठाण्यातील आयऑन डिजिटल झोन येथे सकाळी ८०० पैकी ५३३ उमेदवार परीक्षेला आले हाेते. सकाळी ९ वाजता तपासणी सुरू असताना एका तरुणाची हालचाल संशयास्पद वाटली. त्याची चाैकशी केली असता हॉलतिकिटावरील फाेटो व त्याच्या चेहऱ्यात तफावत आढळली. संशय आल्याने कसून चाैकशी केल्यावर तो उमेदवार नसून अविनाश असल्याचे समोर आले. अविनाशने विकास शेळके या उमेदवाराच्या जागेवर परीक्षा देण्यासाठी आल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात निरीक्षक गौतम पातारे यांच्यासमोर उभे केले. त्याच्यावर आयऑनचे व्यवस्थापक वैभव पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. { जुलै २०१९ मध्ये हर्सूल परिसरात पार पडलेल्या तलाठी परीक्षेत डमी उमेदवार पकडण्यात आले होते.

१४ नोव्हेंबर २०२१ मध्ये मुंबई पाेलिस दलात डमी रॅकेटचे जाळे औरंगाबादमधलेच निघाले. ११ डिसेंबर २०२१ मध्ये पुण्यातील एसआरपी परीक्षेत आढळलेला डमी उमेदवार औरंगाबादचा होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये औरंगाबादमध्ये पार पडलेल्या म्हाडाच्या परीक्षेत डमी उमेदवार आढळले होते. ८ सप्टेंबर रोजी पोलिस भरतीत एकाच दिवसात सातारा व एमआयडीसी सिडको पोलिसांनी दोन डमी उमेदवार पकडले. त्यापैकी एक अल्पवयीन मुलगी निघाली, तर दुसऱ्यात पैठणचे उमेदवार निघाले. शेकटा येथील रणजित राजपूत नामक तरुणाने त्या अल्पवयीन मुलीला लाखो रुपये देण्याचे आमिष दाखवून उमेदवार म्हणून पाठवले होते. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी चिकलठाणा पोलिसांनी गेवराई येथे आरोग्य भरतीच्या परीक्षेत डमी उमेदवार पकडले. त्यात खोकडपुऱ्यातील अभ्यासिकेतून उत्तरे पुरवली जात होती.

दुसरा आराेपी टीव्ही सेंटर परिसरातून घेतला ताब्यात
अविनाशला अटक करताच उपनिरीक्षक सचिन जाधव यांनी िवकासला टीव्ही सेंटर परिसरातून अटक केली. दाेघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अविनाशच्या कपड्यांमध्ये ट्रान्समिटर, ब्ल्यूटूथ, मोबाइल व बाजरीच्या दाण्याएवढे इअरफोन सापडले. त्याआधारे तो बाहेर बसलेल्या टोळीला प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वाचून दाखवणार होता. ही टोळी त्याला उत्तरे पुरवणार होती.

आतापर्यंतच्या टाेळीची पद्धत एकच
मुंबई व औरंगाबाद पाेलिस तसेच चिकलठाणा पोलिसांच्या भरती व आरोग्य भरती परीक्षेत पकडलेल्या डमी उमेदवारांच्या चौकशीत एकच पद्धत अधोरेखित झाली. शिवाय औरंगाबाद ते परभणीपर्यंत या रॅकेटची पाळेमुळे पसरल्याचेही निष्पन्न झाले. मात्र, त्या वेळी ३ लाख रुपयांमध्ये हा व्यवहार ही टोळी करत असे. बुधवारी पकडलेल्या अविनाश व विकासच्या चौकशीत नऊ लाखांत त्यांचा व्यवहार ठरल्याने तीन वर्षांत तीन पटीने या रॅकेटचा दर वाढल्याचे समोर आले आहे.

दोघेही शेतकऱ्यांची मुले, डमी उमेदवार अविनाश करतोय पोलिस भरतीची तयारी
बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या विकासने यापूर्वी परीक्षा दिली. मात्र, यश आले नाही. घरात आई-वडील व चार विवाहित बहिणी आहेत. वडील १७ एकर शेती कसतात. िवकासला नुकतीच मुलगी झाली आहे. त्याच्या जागी परीक्षा देणारा अविनाश बीएच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. वडील शेती करतात. ताे मामाकडे राहून टीव्ही सेंटर परिसरात पोलिस भरतीची तयारी करतो. पोलिस चौकशीत त्याने तोंड उघडले नाही.

बातम्या आणखी आहेत...