आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी महिलादिन...:​​​​​​​धूलिवंदन पाण्याविनाच ; गेल्या चार दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळ

छत्रपती संभाजीनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात एकीकडे महिला दिनानिमित्त अनेक ठिकाणी स्त्रीशक्तीचा सन्मान होत होता, तर दुसरीकडे घरात पाणी नसल्यामुळे महिला दीन (हवालदिल) झाल्या होत्या. फारोळा नवीन व जुने पंपगृह येथे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठ्याचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले होते. त्यात धुळवडीच्या दिवशी घरात पाणी नसल्यामुळे रंगाचा बेरंग झाला. सोमवार, मंगळवार, बुधवारसह पाण्याचे टप्पे असलेल्या अनेक भागांत पाणी आलेच नाही. मुकुंदवाडी परिसरात नऊ दिवसांपासून पाणी नसल्याचे त्या भागातील नागरिकांनी सांगितले.

पैठण तालुक्यात सोमवारी (६ मार्च) रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सबस्टेशन यार्डमध्ये स्पार्किंग होऊन पंपिंग बंद झाले. पंप क्रमांक तीनची आऊटलेट पाइपलाइन फुटल्यामुळे वेल्डिंगचे काम हाती घ्यावे लागले. कर्मचाऱ्यांनी पहाटे ३ वाजून ३५ मिनिटांनी पाणीपुरवठा पूर्ववत केला. साडेसहा तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे मंगळवारचा (७ मार्च) पाणीपुरवठा विस्कळीत झाला. मंगळवारी धूलिवंदनाच्या दिवशी अनेक भागांना पाणी मिळाले नाही.

त्यातच मंगळवारी दुपारी पुन्हा दुपारी पाऊण वाजता पंप हाऊसमध्ये बिघाड झाला. त्याच्या दुरुस्तीसाठी ११ तास पाणीपुरवठा बंद करावा लागला. याच काळात ट्रान्सफॉर्मर क्र. २ चे ऑइल लिकेज तसेच ट्रान्सफॉर्मर क्र. ३ चे डिओ फ्यूज लिंक शॉर्ट झाले होते. त्यामुळे त्यातही आवश्यक दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्रीपासून पंपिंग पूर्ववत सुरू करण्यात आले.

३ दिवसांचे नियोजन बिघडले {होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी शहरातील अनेक भागांत पाणी पुरवठा झाला नाही. दोन दिवसांचा खंड पडल्याने अगोदरच पाच दिवसांआड मिळणारे पाणी आता आठ दिवसांनंतरच मिळणार आहे. त्यामुळे अनेक भागांतील रहिवाशांनी खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेतले. {फारोळा येथील पंपिंग सुरू केल्यानंतर बुधवारी पहाटे चार वाजता जलकुंभात पाणी आले. ज्या भागाला मंगळवारी पाणीपुरवठा झाला नाही तेथे गुरुवारी दुपारनंतर पाणी दिले जाणार आहे. मात्र, संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे.

उन्हाळ्याच्या प्रारंभीच नियोजन कोलमडले दरवर्षी उन्हाळ्याच्या काळात शहरात पाण्याचे नियोजन कोलमडते. सध्या उन्हाळ्याची सुरुवातच आहे. तरीही पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळ्यासाठी मनपाने पाणीपुरवठा योजनेत अनेक सुधारणा करत असल्याचे सांगितले आहे. अनेक मॅरेथॉन बैठकांचे सत्रही सुरूच आहे. हे नियोजन प्रत्यक्षात उतरले नसल्याचे दिसत आहे. यापुढील काळात तरी नियमित पाणीपुरवठा व्हावा, अशी अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...