आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टुरिंग टॉकीज:युद्धभूमीवरचा कर्तव्यपथ

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘नाईंटीन सेव्हन्टीन’चे दिग्दर्शक सॅम मेंडिसचे आजोबा पहिल्या महायुद्धात सैनिक होते. त्यांच्याकडून ऐकलेल्यांपैकी एका गोष्टीने सॅमला नेहमी भुरळ घातली. निरोप पोहोचवण्यासाठी एका सैनिकाने कशी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, याची ती गोष्ट. तो ही गोष्ट रचत असताना एकाचे दोन सैनिक झाले- ब्लेक आणि स्कोफील्ड. प्रेक्षकांना या दोघांची कामगिरी आपली वाटली पाहिजे, यासाठी सॅमने एकाच शॉटमध्ये हा चित्रपट बनवला. त्यामुळं तो पाहताना आपणही युद्धभूमीवरचा तो दिवस जगतो अन् स्कोफील्ड इप्सित स्थळी पोहोचल्यावर सुटकेचा निःश्वासही टाकतो.

वि स्तीर्ण पसरलेल्या कुरणात पिवळी पांढरी गवतफुलं वाऱ्यावर हलकी डोलताहेत. कॅमेरा हलतो अन् दोन मित्र विसावा घेताना दिसतात. डोक्यावर सैनिकी हेल्मेट ओढून शांतपणे पहुडलेले. त्यांचा वरिष्ठ येऊन त्यातल्या एकाला हलवतो, ‘कॉर्पोरल ब्लेक उठ! एकाला निवड आणि माझ्या मागं ये, जनरलनी बोलावलंय तुला..’ ब्लेकची (डीन चार्ल्स चॅपमन) तंद्री मोडते अन् तो शेजारच्या कॉर्पोरल स्कोफील्डला (जॉर्ज मकाय) हलवतो, ‘चल माझ्याबरोबर..’ स्कोफील्ड आपसूक ब्लेकच्या मागंमागं खंदकात शिरतो. ब्रिटनची फौज फ्रान्समध्ये जर्मन सैन्याविरूद्ध लढतीय. वर्ष आहे १९१७. ब्रिटिश खंदकाच्या समोर जर्मन सैन्याचे खंदक आहेत. मध्ये नोमॅन्स लँड. ब्लेक आणि स्कोफील्ड जनरलला रिपोर्ट करतात. जनरल ब्लेककडे बघून म्हणतो, ‘तुला नकाशे चांगले कळतात म्हणे, खरं आहे का ते?’ त्याच्या उत्तराची वाट न बघता जनरल पुढे बोलतो, ‘एकुस्त गावाच्या पुढं आपली एक तुकडी आहे, ती उद्या जर्मन सैन्यावर चढाई करणार आहे. तिथले जर्मन नाहीसे झालेत जणू. पण, तो त्यांचा गैरसमज आहे, कारण जर्मन सैन्यानं सापळा रचलाय. त्यांनी मोठ्या प्रमाणावर सैन्य, दारूगोळा जमवलाय अन् आपले सैनिक त्यांच्या हाती आयते लागणार आहेत’. ‘किती सैनिक आहेत तिथं?’ ब्लेक विचारतो, ‘सोळाशे आणि त्यात तुझा भाऊ जोसेफही आहे. आता या सोळाशे जणांना वाचवण्याचा एकच मार्ग शिल्लक आहे, तो म्हणजे त्यांना जाऊन माझा हा आदेश पोचवणे. कर्नल मॅकेंझीला हे पत्र द्या. त्याला सांगा, चढाई करु नका, नाही तर मराल. जर्मन सैन्य समोरची तुकडी सोडून गेलेय, तुला काही विरोध होणार नाही. आता तुझ्या भावाचं आणि इतर सोळाशे जणांचं आयुष्य तुझ्या हातात आहे, निघ तू..’ जनरलला सॅल्यूट ठोकून ब्लेक तरतरा जायला निघतो, मागून स्कोफील्ड पळायला लागतो, ‘अरे थांब, तू काही विचार केला आहेस का? जनरल सांगतोय जर्मन सैन्य समोरची तुकडी सोडून गेलंय, पण कसं शक्य आहे ते..?’ ब्लेक चालणं थांबवत नाही, स्कोफील्ड त्याच्यामागून चालत चालत त्याला समजावतोय...

‘नाईंटीन सेव्हन्टीन’ किंवा ‘१९१७’ या चित्रपटाची ही सुरूवात. इथून पुढे ब्लेक आणि स्कोफील्ड हे दोन सैनिक आपल्या जनरलचा निरोप पोचवण्यासाठी न थांबता कूच करतात. दुसऱ्या दिवशी पहाटेपूर्वी त्यांना सांगितलेल्या ठिकाणी पोचायचं आहे. घड्याळाचे काटे पुढं पुढं जाताहेत. त्यांच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. जर्मन सैन्याकडून होणारा गोळीबार, चिखलाचा खच, त्यात खचलेले मृतदेह, नदी-नाले, रात्रीला दिवस करणारा बॉम्बहल्ल्यांचा प्रकाश.. चित्रपटाचे प्रेक्षकही त्या दोघांबरोबर जनरलची चिठ्ठी घेऊन चालत राहतात. एका क्षणी स्कोफील्ड वैतागून ब्लेकला म्हणतो, ‘कशाला आणलंस तू मला बरोबर?’ ‘मला काय माहीत होतं, रणभूमीच्या मधोमध प्रवास करायला सांगणार आहेत मला? मला वाटलं कुठं काहीतरी सोपी कामगिरी असेल..’ ब्लेक उत्तरतो.

कितीही वैतागला तरी स्कोफील्डला ब्लेकबद्दल माया आहे. कूच करताना तो ब्लेकला पुढे जाऊ देत नाही, ‘एज बिफोर ब्युटी’ (मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, तू कोवळा तरुण आहेस) असं म्हणत संकटाला आधी सामोरं जातो. जनरलने सांगितल्याप्रमाणं पुढची जर्मन तुकडी खंदक सोडून गेली आहे. जाताना त्यांनी आपल्याच तोफा नष्ट केल्या आहेत. जर्मन बंकर बघून ब्लेक प्रभावित होतो आणि म्हणतो, की अरे, यांचे तर उंदीरही आपल्यापेक्षा मोठे आहेत. आणि त्याच उंदरामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. जर्मनांनी जाता जाता बंकर्सला सुरूंग लावले आहेत. एक उंदीर त्याच्या दोरीला स्पर्श करतो आणि सुरूंगांचा स्फोट होतो. स्कोफील्ड गाडला जातो. ब्लेक बंकरबाहेर काढत त्याचे प्राण वाचवतो. ‘आता तुझं मेडल नक्की!’ स्कोफील्ड त्याला सांगतो. ‘खरंच?’ ब्लेक हरखून जातो. इथं स्कोफील्ड आणि ब्लेक यांच्यातला फरक फार सुंदरपणे समोर येतो. एकाला अनुभव आहे, दुसऱ्याकडं उमेद आहे. एक साशंक आहे, दुसरा बेधडक आहे. एक आपल्या कुटुंबाबद्दल काहीही बोलत नाही, तर दुसऱ्याची घरच्यांबद्दल सतत टकळी चालू आहे.

जर्मन खंदक पार करुन हे दोघे एका घराच्या परिसरात पोचतात. तिथली चेरीची झाडं तोडून जर्मन पुढे गेलेत. ‘ही झाडं तुटली तरी मरणार नाहीत... अजून जास्त झाडं पुढच्या वर्षी उगवतील..’ ब्लेक सांगतो. ‘तुला चेरीच्या झाडांबद्दल कसं माहिती?’ स्कोफील्ड विचारतो. ‘माझ्या घराच्या अंगणात चेरीची झाडं आहेत..’ ब्लेकची टकळी सुरू राहते. त्या घराच्या आवारातून त्यांना मित्र राष्ट्रांची दोन विमानं एका जर्मन विमानाच्या मागे लागलेली दिसतात. जर्मन विमान कोसळते आणि त्याला आग लागते. त्या वैमानिकाला दोघे ओढून बाहेर काढतात आणि वाचवतात. ब्लेक वैमानिकासाठी पाणी आणायला स्कोफील्डला पाठवतो. स्कोफील्ड पाणी भरत असताना तो वैमानिक ब्लेकला भोसकतो. स्कोफील्ड वैमानिकाला गोळ्या घालून संपवतो आणि ब्लेककडे धावतो. ‘चल, तुला मी घेऊन जातो. आपण जाऊ लवकर..’ असं तो म्हणतो. पण, ब्लेकची जखम खोल आहे. ‘मी मरणार आहे का?’ रडवेला ब्लेक स्कोफील्डला विचारतो. ‘हो, आय थिंक सो..’ स्कोफील्ड उत्तरतो. ‘माझ्या आईला पत्र लिहिशील का? मी शेवटी घाबरलो नव्हतो सांग तिला..’ रडत रडत ब्लेक स्कोफील्डला सांगतो अन् त्याच्या मांडीवर प्राण सोडतो. त्याची अंगठी आणि डॉग टॅग (गळ्यातला बिल्ला) घेऊन स्कोफील्ड पुढं निघतो. थोड्या अंतरासाठी त्याला दुसऱ्या एका तुकडीच्या गाडीतून प्रवास करता येतो, पण एकुस्तकडे जाणारा पूल तुटला आहे, म्हणून गाड्या फिरून जाणार असतात. सुरूवातीला वैतागलेला स्कोफील्ड आता काहीही करुन ब्लेकचे राहिलेले काम पूर्ण करायला निघाला आहे. पूल पार करताना त्याच्यावर गोळीबार होतो. त्या दिशेने गेल्यावर एका जर्मन सैनिकाबरोबर त्याची चकमक होते. तो बेशुद्ध पडतो, पण जर्मन सैनिक मरतो. शुद्धीवर आल्यावर स्कोफील्डच्या लक्षात येतं, की रात्र झाली आहे अन् सगळीकडं बॉम्बचा वर्षाव सुरू आहे.

बॉम्बहल्ल्यांमध्ये खंडहर बनलेल्या एकुस्तमधून पळून जात असताना जर्मन सैनिक त्याच्या मागं लागतात. एक फ्रेंच मुलगी त्याला आसरा देते, त्याच्या जखमांना मलमपट्टी करते. तिच्याजवळ एक लहान बाळ आहे. स्कोफील्ड तिला त्याच्याजवळचा सगळा शिधा देतो आणि पुढं निघतो. ती त्याला पुढं न जाण्यासाठी विनवते, पण त्याचा नाईलाज आहे. सकाळ व्हायच्या आत त्याला निरोप पोहोचवायचा आहे. मागे लागलेल्या जर्मन सैनिकांचा पाठलाग चुकवताना स्कोफील्ड एका मोठ्या धबधब्यात कोसळतो, पाण्याचा ओघ नेईल तिथवर जातो. शेवटी फुगलेल्या मृतदेहांच्या दलदलीतून तो किनाऱ्याला लागतो. धावून, लढून, जखमी होऊन स्कोफील्ड खूप दमला आहे. कसाबसा चालत असताना त्याला एका गाण्याचे सूर ऐकू येतात, त्या सुरांच्या मागं गेल्यावर तो शोधत असलेली तुकडी त्याल दिसते. ज्या कर्नल मॅकेंझीकडे त्याला निरोप पोचवायचा आहे, तो चढाईच्या नेतृत्वासाठी पुढं गेला आहे आणि सैनिकांची पहिली कुमक हल्ला करायला रवाना झाली आहे. स्कोफील्ड थेट युद्धभूमीवरून पळत पळत कर्नल मॅकेंझीला गाठतो आणि चढाई थांबवतो. त्याच्यावर सोपवलेली कामगिरी पार पडली आहे. ब्लेकच्या भावाला शोधत तो छावणीभर फिरतो आणि तो दिसल्यावर त्याला ब्लेकच्या मृत्यूची बातमी सांगत त्याची अंगठी आणि बिल्ला देतो. त्याची जबाबदारी आता खऱ्या अर्थानं पूर्ण झाली आहे.

‘नाईंटीन सेव्हन्टीन’चे दिग्दर्शक सॅम मेंडिसचे आजोबा पहिल्या महायुद्धात सैनिक होते. त्यांच्याकडून ऐकलेल्यांपैकी एका गोष्टीने त्याला नेहमी भुरळ घातली. निरोप पोचवण्यासाठी एका सैनिकाने कशी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, याची ती गोष्ट. तो ही गोष्ट रचत असताना एकाचे दोन सैनिक झाले - ब्लेक आणि स्कोफील्ड. हा चित्रपट इतका प्रभावी बनण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तो एकाच शॉटमध्ये चित्रीत केला आहे. म्हणजे संपूर्ण चित्रपटात कुठेही कट नाही, एक प्रसंग सोडून दुसरा सुरू होत तनाही. प्रेक्षकांना ब्लेक आणि स्कोफील्डची कामगिरी आपली वाटली पाहिजे, यासाठी सॅमने एकाच शॉटमध्ये हा चित्रपट बनवला. त्यामुळं तो पाहताना आपणही एकोणीसशे सतरामधला युद्धभूमीवरचा तो दिवस जगतो अन् स्कोफील्ड इप्सित स्थळी पोचल्यावर सुटकेचा निःश्वासही टाकतो.

भक्ती चपळगावकर bhalwankarb@gmail.com

बातम्या आणखी आहेत...