आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:डीवायएसपी 2 लाखांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात, तीन महिन्यांत दुसरा अधिकारी अडकला लाचखोरीत

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकीकडे पोलिस अहोरात्र रस्त्यावर, तर दुसरीकडे डीवायएसपी खिरडकर अडकले लाचखोरीत

राज्यासह जालना जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलिस अहोरात्र झटत आहेत. परंतु दुसरीकडे पोलिस प्रशासनात लाच घेण्याच्या घटना वाढल्याने जिल्ह्यातील पोलिसांची प्रतिमा डागाळली जात असल्याचे चित्र आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांना २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यामुळे चांगले काम करणाऱ्या पोलिसांच्या प्रतिमेलाही तडा जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दोन महिन्यांपूर्वी मंठा ठाण्यातील तत्कालीन पोलिस निरीक्षक विलास निकम यांना लाच घेताना पकडले होते. आता थेट उपविभागीय अधिकारी पकडले गेल्याने पोलिस प्रशासनात खळबळ माजली आहे.

१७ मार्च २०२१ रोजी मंठा ठाण्यातील तत्कालीन पोलिस निरीक्षक विलास दिनकरराव निकम यांना खंडपीठाकडून मागवल्या जाणाऱ्या अहवालामध्ये मदत करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे, तर दोन महिने होत नाही तोच उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासह संतोष निरंजन अंभोरे (पोलिस नाईक, कदीम ठाणे, जालना), विठ्ठल पुंजाराम खार्डे (३५, पोलिस शिपाई, उपविभागीय पोलिस अधिकारी, जालना) हेच लाच स्वीकारण्याच्या जाळ्यात अडकल्यामुळे जालना पोलिस दलात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी खिरडकर हे पोलिस दलात अधिकारी म्हणून येण्यापूर्वी चौदा वर्षे शिक्षक राहिले आहेत. अनेकदा मुलाखत अथवा विविध ठिकाणी होणाऱ्या भाषणातून त्यांनी ‘जेथे असू तेथे पॉझिटिव्ह काम करावं,’ असा संदेश दिला. पण तेच लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत.

खिरडकर यांनी जालन्यात रूजू होण्याआधी चंद्रपूर, बीड येथे होते. जालन्यातही त्यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपण्याच्या शेवटच्या टप्प्यात होता. परंतु, जाता-जाताच ते एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. कडवंची येथे लाच स्वीकारताना अंभोरे याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आल्याची माहिती एसीबीचे उपअधीक्षक रवींद्र निकाळजे यांनी दिली.

... तर कठोर कारवाई करणार
प्रत्येक महिन्यात होणाऱ्या क्राइम मीटिंगमध्ये गुन्ह्यांचा आढावा घेतला जातो. हा आढावा घेत असताना लाचेच्या प्रकरणासंदर्भात सूचना केल्या जातातच. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पैशासाठी कुणाचीही अडवणूक करू नये. असे प्रकार आढळल्यास कारवाई करण्यात येईल.

दोन दिवसांपासून सापळे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक १९ ते २० मे अशा दोन दिवसांपासून सापळे लावत आहे. १९ तारखेचा सापळा फेल झाला. २० तारखेला हा सापळा यशस्वी झाला आहे. कडवंची येथे रक्कम स्वीकारताना अंभोरे यास ताब्यात घेण्यात आले. यानंतर सुधीर खिरडकर आणि खार्डे यांना ताब्यात घेतले.

कदीम ठाण्यातील अंभोरे डीवायएसपींकडे, पीआय महाजन यांनी दिला जबाब
कदीम पोलीस ठाण्यातील संतोष निरंजन अंभोरे हा कडवंची येथे पैसे स्वीकारण्यासाठी कसा जातो. ही लिंक किती दिवसांपासून आहे, अंभोरे व खार्डे यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनीसुध्दा एसीबीच्या कार्यालयात येऊन काही जबाब दिला आहे. अंभोरे हा ठाण्यात कधी आला, नाही आला तर काय सांगून गेला, कडवंची येथे तो कसा गेला, ठाण्यात रजा टाकली की, डीवायएसपींचे आदेश म्हणून गेला, याबाबतची सर्व माहिती महाजन यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...