आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुड न्यूज:देशातील भूकंपाची नोंद आता हिंगोलीत होणार; दिल्लीच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था उभारणार हे प्रकल्प

हिंगोलीएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • हिंगोली, सोलापुरात उभारली जाणार भूकंपमापक केंद्रे

दिल्लीच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेकडून हिंगोलीसह सोलापूर येथे भूकंपमापक केंद्रे उभारली जाणार असून त्यासाठी या संस्थेने हालचाली सुरू केल्या आहेत. वरील दोन्ही ठिकाणी भूकंपमापक केंद्र उभारण्याच्या स्वामी रामानंद विद्यापीठाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता देशातील कोणत्याही भूकंपाची नोंद हिंगोलीत होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ, कळमनुरी व वसमत तालुक्यात मागील काही दिवसांपासून जमिनीतून आवाज होण्याचे प्रकार वाढले आहेत. याशिवाय इतर ठिकाणीही कमी रिश्‍टर स्केलचे भूकंप होत आहेत.

मात्र त्याच्या अनेक वेळा नोंदी होत नाहीत. त्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू उद्धव भोसले, भूकंपशास्त्र विभागाचे प्रमुख टी. विजयकुमार यांनी विद्यापीठांतर्गत आठ ठिकाणी निरीक्षण केंद्र स्थापन केले आहेत. यामध्ये नांदेड, हिंगोली, सोनपेठ, कळंब, कुर्डूवाडी, औराद, सोलापूर आदी प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. मात्र हे निरीक्षण केंद्र दूर अंतरावर असल्यामुळे कमी तीव्रतेच्या भूकंपाच्या नोंदी व भूगर्भातील झालेल्या हालचालींची माहिती मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे विद्यापीठाने दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेकडे दोन ठिकाणी केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव दिला होता.

त्यात हिंगोली व सोलापूर या ठिकाणी भूकंपमापक केंद्रे मंजूर करण्याची विनंतीही या संस्थेला केली होती. त्यासाठी हिंगोलीत मॉडेल कॉलेजची जागादेखील उपलब्ध करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेने या केंद्राच्या उभारणीला मान्यता दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी लागणारी यंत्रे हिंगोलीत दाखल झाली आहेत. पुढील काही दिवसांतच या केंद्राच्या कामाला सुरुवात होणार आहे.

भूगर्भातील हालचालींची माहिती मिळणार
दिल्ली येथील संस्थेकडून कायमस्वरूपी भूकंपमापक केंद्र उभारले जाणार आहे. त्यामुळे भूगर्भात होणाऱ्या हालचालींची माहिती मिळणार अाहे. याशिवाय कमीत कमी तीव्रतेच्या भूकंपाची देखील नोंद होणार असल्याने मोठा डाटा तयार करता येणार आहे. त्याचा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयोग होणार आहे. - टी. विजयकुमार, विभागप्रमुख, भूकंपशास्त्र विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

भूकंपमापक केंद्रासाठी न्यू मॉडेल डिग्री कॉलेजची जागा
हिंगोली येथील न्यू मॉडेल डिग्री कॉलेज मध्ये भूकंपमापक केंद्र उभारले जाणार आहे त्यासाठी स्वतंत्र कक्ष देण्यात आला असून प्राचार्य प्रभाकर हरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ व्यक्तींकडून या केंद्राची काम पाहिले जाणार आहे

बातम्या आणखी आहेत...