आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी हतबल:खंडाचा परिणाम; सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही दुबार पेरणीचे संकट

औरंगाबादएका महिन्यापूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • आठही जिल्ह्यांत 35 टक्के पेरणी पूर्ण; नंतर पाऊस झाला गायब

मराठवाड्यात यंदा सलग दुसऱ्या वर्षी सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के जास्त पाऊस पडला. यामुळे आठही जिल्ह्यांत खरीप पेरणीला वेग आला होता. ३५ टक्के पेरणीही झाली. पण स्थळनिहाय पावसाच्या वितरणात कमालीचा फरक राहिला. पावसाच्या खंडाचे प्रमाण वाढले. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यातच बियाण्यांचा तुटवडा, बोगस व निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्री हाेत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

यंदा मान्सूनपूर्व पावसासह मान्सूनचेही वेळेत आगमन झाले. पुढेही मान्सून चांगला राहणार असल्याचे भाकीत हवामान विभाग व शास्त्रज्ञांनी वर्तवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणी सुरू केली. मात्र, हवामानातील बदलामुळे जेथे पोषक वातावरण तयार होते तेथेच अत्यल्प ठिकाणी धो-धो मुसळधार पाऊस पडतोय. उर्वरित ठिकाणी कोरडेठाक अथवा भुरभुर पडतोय. दिवसभर ढगांचे आच्छादन राहते, पण पाऊस पडत नाही. पहिले एक-दोन माेठे पाऊस झाले, पण नंतर पावसाने ओढ दिली. यामुळे कोवळी पिके उगवल्याबरोबर कोमेजून जात असून दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

१ ते २४ जूनदरम्यान पावसाच्या वितरणातील फरक
जिल्हा पावसाचे पर्जन्यमान टक्केवारी
औरंगाबाद १२ १०३.८ ८२.९
जालना १२ १४४.१ १०८.७
बीड १५ १५२.४ ११८.७
लातूर १६ १५६.२ ११५.४
उस्मानाबाद ९ १०५.३ ८३
नांदेड १४ १७८.१ ११४.६
परभणी १४ २०४.१ १४०.५
हिंगोली ११ १८५.६ १०९.७

उगवणीवर परिणाम, बियाण्याचा तुटवडा
मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पाऊस येणारच या आशेवर ३५ टक्के खरीप पेरणी उरकून घेतली. सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झालेली आहे. पावसाने ओढ दिली व खंडाचे प्रमाण वाढल्याने पेरलेले बियाणे कोमेजून गेले. उगवणक्षमतेवरच गंभीर परिणाम झाला. यातच बियाण्यांचा तुटवडा अन् आता दुबार पेरणीसाठी बियाणे मिळणे कठीण होणार असल्याने हा प्रश्न गंभीर होणार अाहे.

सोयाबीनची सर्वाधिक ५० टक्के पेरणी
मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला सर्वाधिक पसंती दिली आहे. २४ जूनपर्यंत ५०.८२ टक्के प्रत्यक्ष पेरणी झाली. त्यापाठोपाठ मूग, उडीद, मका आणि कपाशीला प्राधान्य देण्यात आले आहे.

पेरणीचा आलेख
औरंगाबाद, बीड, जालना येथे भात पेरणीयोग्य पाऊस नसल्याने भाताची पेरणी शून्य आहे. खरीप ज्वारी १३ टक्के, बाजरी १९, मका ३४, तूर ४१, मूग २२, उडीद ४४, सोयाबीन ५०, भुईमूग २०, सूर्यफूल १३, तीळ १४, कारळ ७, कापूस ३२ टक्के पेरणी झाली आहे. लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत भाताची पेरणी ३ टक्के, ज्वारी ६, बाजरी ११, मका १२, तूर ३२, मूग २१, उडीद २५, भुईमूग ६, तीळ ५, कारळ ५, सूर्यफूल १, सोयाबीन ५६, कापूस ३७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.

बातम्या आणखी आहेत...