आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:टेक्स्टाइल क्लस्टरसाठी प्रयत्न; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

आज अनेक क्षेत्रांत प्रगती करत असलेल्या औरंगाबादेत टेक्स्टाइल क्लस्टर आणण्याचे प्रयत्न करत असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली. दिव्य मराठीतर्फे आयोजित ‘दिव्य मराठी बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड - २०२२’ सोहळा डॉ. कराड यांच्या विशेष उपस्थितीत झाला त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हॉटेल रामामध्ये शनिवारी (१२ मार्च) झालेल्या सोहळ्यात गेल्या १२ वर्षांपासून विविध क्षेत्रांत उत्कृष्ट काम करणाऱ्या ५५ जणांना गौरवण्यात आले. या वेळी डॉ. कराड म्हणाले की, औरंगाबाद शहरात पर्यटन वाढावे, चिकलठाणा विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे यासाठी मी पावले टाकत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत देशभरात सुमारे चार ते साडेचार कोटी लोकांना घरे मिळाली. औरंगाबादेत जागेअभावी ही योजना रखडली. येथून ८२ हजार लोकांच्या घरासाठी शनिवारी मनपा प्रशासकांसोबत बैठक घेतली. त्यांना ३१ मार्चपर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. औरंगाबाद शहराला पुढे नेण्याचे काम दिव्य मराठी करत आहे. भास्कर वृत्तपत्र समूह देशातील मोठा समूह असून त्यामार्फत अनेक चांगली कामे होत आहेत, असेही ते म्हणाले.

डॉ. रुणवाल हृदियम हार्ट केअर सेंटर या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक होते. या वेळी दिव्य मराठीचे स्टेट सॅटेलाइट हेड सुभाष बोंद्रे, युनिट हेड बेंजामिन रॉक, डेप्युटी एडिटर महेश रामदासी, क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडिया, डॉ. रुणवाल हृदियम हार्ट केअर सेंटरचे डॉ. श्रेयश रुणवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. रुणवाल यांनी मराठवाड्यातील पहिले अत्याधुनिक हार्ट केअर सेंटर, राज्यातील पहिली कॅथलॅब कॅनॉट परिसरात सुरू होईल, असे सांगितले. सारेगमप फेम रेणुका टाकळकर, झी युवा संगीतसम्राट महासंग्राम महाविजेता पार्श्वगायक रवींद्र खोमणे यांनी हिंदी-मराठी गीते सादर केली. सलोनी शेलकर यांनी सूत्रसंचालन केले.

आव्हानांचे रूपांतर संधीत करणे गरजेचे : टोपे
टोपे म्हणाले की, जीवनात आव्हाने येणारच. त्यांचे रूपांतर संधीत करणे गरजेचे आहे. दिव्य मराठी नेहमीच सामाजिक भान, जाण ठेवत विविध चांगली सामाजिक कामे करत आहे. डॉक्टर देवदूत आहेत. आपला रिकव्हरी रेट ९८ टक्के एवढा असून त्याचे श्रेय डॉक्टरांचे आहे. कोरोनाकाळात सगळ्याच क्षेत्रातील लोकांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने काम केले. रिअल इस्टेटमध्येही ‘ग्रीन बॅक टू द सोसायटी’ या उद्देशाने काम होत आहे. नकारात्मक दृष्टिकोनाचे खूप जण असतात, पण तुम्ही सकारात्मकतेने कार्यरत राहिलात तर यश मिळते, असेही त्यांनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक करताना नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...