आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी:एकनाथ रंगमंदिरच्या रस्त्याची वाहतूक कोंडी सुटेना; नागरिकांना सहन करावा लागत आहे मनस्ताप

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गोपाल टी पॉइंट ते संत एकनाथ रंगमंदिरमार्गे जाणारे वाहनधारक त्रस्त

शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत बस स्टॉप उभारण्यात आले आहेत. नुकतेच संत एकनाथ रंगमंदिराचे लोकार्पण होऊन नाट्यगृह सुरू झाले. मात्र भिंतीजवळ बस स्टॉप असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कोंडी होत आहे. यामुळे येथील बस स्टॉप हटवण्यात यावा, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

सेव्हन हिल्स ते बाबा पेट्रोल पंपापर्यंत अंतर्गत चौक बंद आहे. आकाशवाणी चौकसुद्धा सुर्वातीला काही तास सुरू ठेवण्याचे नियोजन होते. तसेच, अमरप्रीत हॉटेल चौकसुद्धा नियोजित वेळेत सुरू ठेवायचे असताना तसे होत नाही, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. संध्याकाळी चौक बंद असल्याने वाहनधारक क्रांती चौकमार्गे गोपाल टी पॉइंट आणि संत एकनाथ रंगमंदिरामार्गे रोपळेकर चौक, ज्योतीनगर, उल्कानगरीच्या रस्त्यावरून जातात. संत एकनाथ रंगमंदिराचा रस्ता आधीच अरुंद असून रंगमंदिरासमोर महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटीअंतर्गत बस स्टॉप उभारला आहे. त्यामुळे संध्याकाळी वाहतुकीची कोंडी होते.

बस स्टॉप हटवण्यासाठी पाठपुरावा सुरू
बस स्टॉपमुळे आठ कोटींचा खर्च करून तयार झालेल्या नाट्यगृहाचा दर्शनी भाग झाकला गेला आहे. संत एकनाथ महाराजांचा पुतळासुद्धा झाकला गेला आहे. हा बस स्टॉप काढण्यात यावा यासाठी पाठपुरावा सुरू असून मनपाला निवेदन दिले आहे. - शिल्पाराणी वाडकर, माजी नगरसेविका

मनपाचा निर्णय चुकीचा
संत एकनाथ मंदिर ते गोपाल टी पॉइंट हा रस्ता अरुंद आहे. त्यातच बस स्टॉप उभारल्याने वाहतूककोंडी होतेय. याबाबत मनपाला सांगूनही एका दिवसात हा स्टॉप उभारला आहे. मनपाचा हा निर्णय चुकीचा आहे. - प्रीतपालसिंग मखिजा, व्यावसायिक

गरज नसताना बस स्टॉपची उभारणी
या रस्त्यावर कोचिंग क्लासेस, फास्टफूड हॉटेल्स, मेडिकल आहेत. ग्राहकांसाठी पार्किंग नाही. बस स्टॉपची गरज नसताना उभारला आहे. प्रशासनाने तो हटवावा. तसेच, अमरप्रीत चौक रस्ता खुला करावा. - रोमी छाबडा, व्यावसायिक

संत एकनाथांचा पुतळाही झाकला
या बस स्टॉपमुळे नाट्यगृहाचे रुपडे दिसत नाही. या रस्त्यावर पार्किंगसाठी जागा नाही. वाहतुकीची कोंडी होते म्हणून बस स्टॉप हटवावा. -नीलेश देशपांडे, व्यावसायिक

गोपाल टी पॉइंट ते उत्सव चौकाकडे येणाऱ्या वाहनधारकांची संख्या जास्त आहे. हा रस्ता अरुंद असून बस स्टॉपची गरज नसताना उभारण्यात आला आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. - इम्रान शेख, व्यावसायिक

बस स्टॉपने जागा व्यापली
रस्त्यावर गाड्या लावण्यास येथे जागा नाही. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. बस स्टॉपमुळेही जागा व्यापली असून या ठिकाणी गरज नसताना बस स्टॉप उभारण्यात आला आहे. - जसदीपसिंग सौडी, व्यावसायिक

प्रेमीयुगुलांना बसण्याचे ठिकाण
येथे पार्किंगला जागा नसल्याने वाहतूककोंडी होते. कोचिंग क्लासेच्या विद्यार्थ्यांना बसची गरज पडेल, असे वाटत नाही. दिवसभर तरुण-तरुणी या स्टॉपवर येऊन बसतात अन् बाजूलाच गाड्या लावतात. - हरप्रीत छाबडा, व्यावसायिक

अनेकदा भांडणेही होतात
गोपाल टी पॉइंटपासून संत एकनाथ रंगमंदिरापर्यंत दुकाने, कोचिंग क्लासेस आहेत. दुपारी ३ ते ५ आणि संध्याकाळी ५ नंतरही वाहतूककोंडी होते. कंपनीच्या बसेस येथून जातात. अनेकदा छोटी-मोठी भांडणेही होतात. - अंकुश काल्डा, व्यावसायिक

बातम्या आणखी आहेत...