आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा औरंगाबाद दौरा रद्द झाला आहे. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेंद्रा येथे महाराष्ट्र एक्स्पोचे उदघाटन होणार होते.
दरम्यान, दुसरीकडे या उदघाटनकार्यक्रमापूर्वीच प्रदर्शनाच्या मंडपाबाहेर शापूरजी पालनजी कंपनीच्या सब कॉन्टॅक्टर्सनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
औरंगाबाद येथील शेंद्रा एमआयडीसी मध्ये एडवांटेज महाराष्ट्र एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येणार होते. मात्र, हा दौरा आता रद्द झाला आहे. मात्र याठिकाणी उद्घाटनापूर्वीच उपोषणाचे नाट्य रंगले आहे. शेंद्रा येथील ऑरिक सिटी मध्ये शहापूरजी पालोजी कंपनीमध्ये सब कॉन्टॅक्टर म्हणून काम करणाऱ्या अनेक कंत्राटदारांनी प्रदर्शनाच्या मंडपाबाहेरच उपोषणाचा पवित्रा घेतला. कंपनीने पैसे थकवल्याचा त्यांचा आरोप आहे.
सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन
औरंगाबाद येथील शेंद्रा एमआयडीसीतील ऑरिक सिटी येथे आज महाराष्ट्रातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो 2023 चे उद्घाटन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन पद्धतीने याचे उद्घाटन करतील. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.
10 कोटींचे बिल थकले
उद्घाटनाच्या कार्यक्रमापूर्वीच प्रदर्शनाच्या मंडपाबाहेर शापूरजी पालनजी कंपनीच्या सब कॉन्टॅक्टर्सनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ऑरिक सिटीसाठी या ठेकेदारांनी शापूरजी पालनजी कंपनीचे सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काही कामे केली होती. या कामाचे तब्बल दहा कोटी रुपयांचे बिल झाले. मात्र, काम संपल्यानंतर शापूरजी पालनजी त्यांचे पैसे अदा करत नसल्यांचा या ठेकेदारांचा आरोप आहे. याबाबत त्यांनी अनेक जणांच्या भेटी घेतल्या. ऑरीक सिटीमधील अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडले.
मुख्य मंडपाबाहेर उपोषण
21 ऑक्टोबर रोजी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. याच बैठकीत माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मध्यस्थी करत तक्रार सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, एवढे करूनही त्यांची समस्या काही सुटत नसल्याचा या ठेकेदारांचा आरोप आहे. याचाच निषेध करण्यासाठी आज त्यांनी एडवांटेज महाराष्ट्र एक्सपोच्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाचे मुख्य मंडपाबाहेरच उपोषणाला सुरुवात केली.
आमच्यावर कर्जाचा डोंगर
कंत्राटदार सचिन घाडगे म्हणाले की शहापूर अँड पालनजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आम्हाला दाद देत नाही. बिल मागितले तर कोर्टात जा असा सल्ला देत आहेत. यामुळे कर्जाचा डोंगर उभा राहिलाय. अनेक लोकांचे देणे आहेत. यामुळे आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
उद्घाटन संपन्न
दरम्यान, एडवांटेज महाराष्ट्र एक्सपोच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येऊ शकले नाही. मात्र केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, अतुल सावे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे, औरंगाबाद मध्येचे आमदार प्रदीप जैयस्वाल आणि कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.