आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'लफड' शब्द घोटाळा अर्थाने वापरला, असा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. गेली उडत आमदारकी म्हणत विरोधकांना इशाराही दिला आहे. अपशब्द वापरल्याचे सिद्ध करा, मी आमदारकीचा राजीनामा देईल असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. अंधारे ठाकरेंबाबत काय म्हणाल्या हे देखील पाहायला हवे, अंधारेंना शिव्या देण्याचे कंत्राट कुणी दिले, असा सवाल आमदार संजय शिरसाट यांनी उपस्थित केला.
शिवसेनेचे (शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्त्व्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आज त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. संजय राऊतांविरोधात महिला आघाडीने निदर्शने केली नाहीत, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट
मी काय चुकीचे बोललो आहे? सुषमा अंधारेंना ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी माझ्या घरी बोलवून बहीण म्हणून साडीचोळी दिली आहे. बहिणीबद्दल मी कसे काही चुकीचे बोलेल, आम्ही नाते जपणारे लोक आहोत. मात्र, माझ्या पेक्षा वयाने लहान असलेल्या सुषमा अंधारे या माझा ‘संज्या’, ‘घोडा’ असा उल्लेख करणार हे संस्कृतीला धरुन आहे का? तुम्हाला तो अधिकार दिला आहे का?, असा सवाल संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनिशी बोलताना उपस्थित केला आहे.
संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, सुषमा अंधारेंनी महिला आयोगाकडे तक्रार नक्कीच करावी. चौकशी झालीच पाहिजे. पण, मी काय चुकीचे बोललो, हे तरी सांगा. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संजय राऊत तर गळ्यात पाट्या घेऊन कामाठीपुरात बसवण्यासाठी चालले होते. त्यांच्याविरोधात महिला आघाडीने निदर्शने केली नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
सत्तार, भूमरेंना विचारणा
संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना म्हणालो, तुम्ही काय लफडे केलीत. त्यामुळे अंधारे इकडे सभा घेत आहेत. यात चुकीचे काय आहे. आमच्यावर संस्कार आहेत. ज्यांना शिवसेना कळाली नाही, ते हिंदुत्वावर बोलतात. काही लोक संस्कारावर बोलून, त्या शब्दाचा अपमान करत आहेत.
काय म्हणाले शिरसाट?
आमदार संजय शिरसाट यांची सुषमा अंधारे यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरली होती. ते म्हणाले होते की, 'ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत म्हणते. पण तिने काय-काय लफडी केली आहेत, हे तिलाच माहीत. अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची 38 वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही उरलेले लोक टाळ्या वाजवत आहेत.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना भोवण्याची शक्यता आहे. एकीकडे या प्रकरणी अंधारे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिरसाट यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंबाबत केलेले वक्तव्य गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि क्रिमिनल लॉमध्ये बसणारे आहे. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, असे पत्र अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिस ठाण्यात दिले आहे.
रुपाली पाटील-ठोंबरेंचे सवाल
संजय शिरसाट यांनी मुंबईत 72 व्या मजल्यावर कुणासाठी फ्लॅट घेतला? त्यांच्याकडे 72 कोटी कॅश कुठून आली, त्यातील काही रक्कम मागणारी महिला नेमकी कोण होती. तर संभाजीनगरात पाटील नावाच्या व्यक्तीला अडकविण्याचा प्रयत्न संजय शिरसाट यांनी का केला. त्यासाठी आपली संपूर्ण ताकद का लावली असा सवाल अॅड. रूपाली पाटील - ठोंबरे यांनी केला आहे.
माझे तोंड उघडायला लावू नका, असे म्हणत त्यांनी शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना इशारा दिला आहे. शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल नुकतेच आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर रूपाली पाटील-ठोंबरे आक्रमक झाल्यात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.