आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें दौरा:पैठणच्या बकाल उद्यानाचा एकनाथ करणार "उद्धार' ; उद्यान विकासासाठी निधीची घोषणा

पैठण / रमेश शेळकेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तीर्थक्षेत्र असलेल्या पैठण येथे बंगळुरूच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाची आता बकाल अवस्था झाली आहे. प्रत्येक सरकारमध्ये या उद्यानाच्या विकासासाठी फक्त आश्वासने दिली जातात, कामे मात्र होत नाहीत. यापूर्वी ठाकरे सरकारने घोषणा केली, पण कामे मात्र झाली नाहीत. दैनिक दिव्य मराठीने सतत हा प्रश्न लावून धरला होता. पैठणकरांनीही जोरदार पाठपुरावा केला. त्यामुळे आता उद्यानासाठी २२५ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे, अशी माहिती रोजगार व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १२ सप्टेंबर रोजी पैठणच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यावेळी उद्यानाच्या विकासासाठी निधीची घोषणा मुख्यमंत्री करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उद्यान बचाव समितीचे पवन लोहिया, संतोष गव्हाणे, बाळू आहेर, संतोष गोबरे, बलराम लोळगे यांनी या कामासाठी भरीव निधीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने मंत्री संदिपान भुमरेंनी उद्यानास भेट देऊन पाहणी केली तसेच आता मुख्यमंत्र्यांकडून भरीव निधी मंजूर करुन घेऊ, असे आश्वासन दिले होते.

३१० एकरांत हे उद्यान उभारण्यात आले होते.काश्मीरमधील निशात शालीमार उद्यानाप्रमाणे इथे जल प्रवाह, हरियाणातील पिंजोर उद्यानाप्रमाणे येथेही फलोद्यान शिवाय म्हैसूरच्या वृंदावन उद्यानाप्रमाणे संगीत कारंजेही या उद्यानाच्या वैभवात भर घालत होते. जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी संत एकनाथ मंदिर परिसरातील हे उद्यान राज्यभरातील व देशातील पर्यटनाचे केंद्र ठरले होते. मात्र, शासनाचे या उद्यानाकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची बकाल अवस्था झाली. आता तरी त्याचा विकास होईल, अशी अपेक्षा आहे.

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने अवस्था झाली बकाल कोरोनाकाळात दोन वर्षात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने येथील सर्व वनसंपदा नष्ट झाली आहे. कार्यकारी अभियंत्यांनी कायमच दुर्लक्ष केल्याने ही बकाल अवस्था झाली. आता उद्यानाचा ताबा वेगळ्या टीमकडे देऊन त्याच्या देखभालीवर लक्ष देण्याची मागणी उद्यान बचाव समितीचे पवन लोहिया, संतोष गव्हाणे, बाळू आहेर, संतोष गोबरे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...